एकीकडे भारतामधील हजारो विद्यार्थी युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेले असतानाच दुसरीकडे केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी यांनी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झालाय. परदेशात जाणारे भारतीय विद्यार्थ्यांना देशातील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही असं जोशी यांनी म्हटलंय. हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडलेले असतानाच केंद्रीय मंत्र्याने असं विधान केल्याने संताप व्यक्त केला जातोय. जोशी यांच्या या विधानावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
नक्की वाचा >> Ukraine War: “त्याला ९७ टक्के गुण मिळायचे पण…”; युक्रेनमध्ये मरण पावलेल्या नवीनच्या वडिलांची शिक्षण पद्धतीवर टीका
जोशी काय म्हणाले होते?
एका मुलाखतीमध्ये धारवाडचे भाजपा खासदार असणाऱ्या जोशी यांनी परदेशात वैद्यकीय अभ्यासक्रम शिकणासाठी जाणारे ९० टक्के विद्यार्थी भारतामधील वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही असं म्हटलं होतं. जोशींनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमधील या वक्तव्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली. विरोधकांनीही या प्रकरणावरुन जोशी यांच्यावर टीका केलीय.
नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका
जयराम रमेश काय म्हणाले?
याच विषयावरुन ट्विटवरुन व्यक्त होताना जयराम रमेश यांनी हे वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हटलंय. जोशी हे सरकारचं अपयश लपवण्यासाठी असं वक्तव्य करत असल्याचं जयराम रमेश यांनी म्हटलंय. “मोदी सरकारच्या अपयशावर पांघरुण घालण्यासाठी आणि जाहिरातबाजीमध्ये व्यस्त असल्याचं लपवण्यासाठी मंत्री प्रल्हाद जोशी यांनी असंवेदनशील आणि निर्दयी वक्तव्य केलंय. मोदींचा एकच मंत्र आहे तो म्हणजे नाटो… ‘नो अॅक्शन तमाशा ओन्ली'” असं ट्विट जयराम रमेश यांनी केलंय.
नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल
नक्की वाचा >> Ukraine War: “ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरुन नाव न घेता पटोलेंचा मोदींना टोला
भेटीदरम्यानही सुनावलं…
एकीकडे युद्धग्रस्त युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडलेले असताना मंत्र्याने असं वक्तव्य केल्याने नाराजी व्यक्त केली जातेय. त्यातच जोशी हे युक्रेनमध्ये मृत्यू झालेल्या नवीनच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता तिथेही त्यांना त्यांच्या या वक्तव्यावरुन सुनावण्यात आलं.
आमच्या मुलांना भारतात शिक्षण देणं परवडत नाही…
नवीनप्रमाणेच युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अमित वैसर या विद्यार्थ्याच्या वडिलांनी मंत्र्यांना चांगलाच टोला लगावला. अमितचे वडील व्यंकटेश यांनी, “नवीन असो किंवा माझा मुलगा असो दोघेही नापास झालेले विद्यार्थी नाहीयत. दोघांनीही एसएसएलसी आणि पीयू परीक्षांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेत. आम्हाला आमच्या मुलांना भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण देणं परवडत नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही आम्हाला आमच्या मुलांना शिक्षणासाठी युक्रेनला पाठवावं लागतं,” असं जोशींना सांगितलं.