केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्यात तरुणांना भरती करून घेण्यासाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे तरुणांना ४ वर्षांसाठी सैन्यात भरती केलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना निवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेची घोषणा होताच याचे देशभर पडसाद उमटले आहेत. हजारो तरुणांनी एकत्र येत केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन केलं आहे. बिहारसह इतरही अनेक राज्यात आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून काही रेल्वेगाड्या पेटवून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारच्या या योजनेला अनेक राजकीय नेत्यांनी देखील विरोध केला आहे.
काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनीही अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारची अग्निपथ योजना ही तरुणांना अग्नित ढकलण्याची योजना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अग्निपथ सारखी योजना घेऊन येत असताना याबाबत विरोधी पक्षाला विश्वासात का घेतलं नाही? याबाबत संसदीय बैठक घेतली का? किंवा तुमच्यासाठी योजना आणतोय, असं तरुणांना विचारलं का? असे अनेक प्रश्न कन्हैय्या कुमार यांनी विचारले आहेत.
पुढे बोलताना कन्हैय्या कुमार म्हणाले की, “एखाद्या कुटुंबातील मुलाला जेव्हा सैन्यात नोकरी मिळते, तेव्हा संपूर्ण परिसरात त्याचा सन्मान केला जातो. आणि जेव्हा एखादं पार्थिव शरीर गावात येतं. तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू असूनही त्यांची छाती अभिमानाने फुललेली असते. आमच्या मुलानं देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं, ही भावना त्यांच्या मनात असते. भारतीय सैन्य दलाचा प्रश्न हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तुम्ही याला मस्करी समजू नका,” अशा शब्दांत कन्हैय्या कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“अग्निपथ योजनेतून भरती झालेल्या २५ टक्के तरुणांना सैन्य दलात कायम ठेवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. ते साफ खोटं आहे. या योजनेच्या अटी काळजीपूर्वक पाहिल्या तर लक्षात येईल, २५ टक्क्यांपर्यंत (Upto 25%) तरुणांना नोकरीत कायम ठेवलं जाणार असल्याची अट आहे. म्हणजे २५ टक्क्यांची पण हमी दिली नाहीये.” असंही कन्हैय्या कुमार म्हणाले.
हेही वाचा – ‘अग्निपथ योजनेतून तरुणांची टिंगलटवाळी’, छगन भुजबळांची केंद्र सरकारवर टीका
“ही बाब किती गंभीर आहे, याचा अंदाज तुम्हीच लावू शकता, घोषणा करून तीन दिवसही उलटले नाहीत, तोपर्यंत दोन महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच या योजनेचे जे काही फायदे सांगितले जात आहेत. ते फायदे आधीपासूनच सैन्य भरती प्रक्रियेत आहेत. सैन्यात किंवा पॅरा मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी २५ वर्षांची वयोमर्यादा आहे. त्यामुळे ही नवीन योजना कोणासाठी आणि कशासाठी आहे?” असा सवालही कन्हैय्या कुमार यांनी विचारला आहे.