विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक आज ( १ सप्टेंबर ) मुंबईत पार पडली. या बैठकीत १३ जणांची समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव खासदार के. सी. वेणुगोपाल, खासदार राघव चड्ढा यांच्यासह १३ नेत्यांचा सहभाग आहे. बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठीतून टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पंतप्रधान मोदी नेहमी खोटं बोलत असतात. पण, लोक त्याला खरे समजतात. मराठीत एक म्हण आहे, ‘खोटे बोला पण रेटून बोला.’ असं पंतप्रधान मोदींचं आहे,” असं खरगे यांनी म्हटलं आहे. ते ‘इंडिया’ आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा : मुंबईतील INDIA आघाडीच्या बैठकीत ‘या’ नेत्याची उपस्थिती काँग्रेसला रूचली नाही, थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार; नंतर…

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “कोणालाही न सांगता संसदेच विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मणिपूर जळताना, करोनावेळी, चीन आपल्या जमिनीवर कब्जा करत आहे, तेव्हा विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं नाही. प्रसारमाध्यमे आपल्याजवळ असल्याचं मोदींच्या डोक्यात आहे.”

“छोटे घोटाळे ते करत नाहीत. कॅगच्या अहवालात कोट्यावधींचे समोर आले आहेत. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं मोदी सांगतात. पण, सर्वांना खाण्यास देऊन लोकांना उपाशी मारत आहेत. ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, आम्ही भित्रे नाही आहोत,” असं खरगे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “आमचा लढा हुकूमशाही आणि जुमलेबाजीविरोधात आहे कारण..”, इंडियाच्या बैठकीतून उद्धव ठाकरेंची गर्जना

“मजबुतीने आम्ही काम करत राहू. याला तोडण्याचं काम मोदींनी कितीही केलं, तरी आम्ही भिणार नाही आहोत. पंतप्रधान मोदी नेहमी खोटं बोलतात. पण, लोक त्याला खरे समजतात. मराठीत एक म्हण आहे, ‘खोटं बोला पण रेटून बोला.’ असं पंतप्रधान मोदींचं आहे,” अशी टोलेबाजी खरगे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader mallikarjun kharge taunt narendra modi on marathi khote bola retun bola ssa