माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा राजधर्माची आठवण करून द्यावी, अशी विनंती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी केली. मणिशंकर अय्यर यांनी जेएनयूतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राच्या माध्यमातून अटलबिहारी वाजपेयी यांना उद्देशून पत्र लिहले आहे. या पत्रात अय्यर यांनी वाजपेयी यांच्या काळातील आठवणींना उजाळा देताना, तुमच्या काळातही राजकीय पक्षांमध्ये मतभेद असले तरी असे कधी घडले नव्हते, असे म्हटले आहे. त्या काळात हिंसाचारासंदर्भातील एका विधानामुळे बेपर्वाई आणि संगनमताचे आरोप आत्ताच्या पंतप्रधानांवर झाले होते, तेव्हा तुम्ही त्यांना राजधर्माची आठवण करून दिली होती. आत्ताही तुम्हाला जमले तर तुम्ही तसे करा, असे अय्यर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
या पत्रात अय्यर यांनी अटलबिहारी यांच्या उमेदीच्या काळातील अनेक राजकीय संदर्भांचा उल्लेख केला आहे. त्या काळी आपल्याला अहिंसेविषयी किती अभिमान होता. तीव्र मतभेद व्यक्त करण्याच्या अधिकारावर आपला विश्वास होता, एकुणच आपला सर्वसमावेशकतेवर विश्वास होता. पंतप्रधानपदाच्या काळात तुमचा लाहोरपर्यंतचा बस प्रवास, आग्रा परिषद, सार्क परिषद या माध्यमातून भारत-पाक यांच्यातील द्विपक्षीय संबंध सर्वोच्च पातळीला पोहचले होते. मात्र, आत्ताचा विचार करायचा झाल्यास आपण किती विरोधी परिस्थितीत येऊन पोहचलो आहोत. कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यास गोळी चालविण्याची भाषा करण्यास भाजपचा आमदार कचरत नाही, असे अय्यर यांनी पत्रात म्हटले आहे.
१९६२मध्ये जेव्हा सी.एन. अण्णादुराई राज्यसभेवर निवडून आले तेव्हा त्यांनी स्वतंत्र द्रविडीस्तानची मागणी उचलून धरली होती. हिंदी देशाची राष्ट्रभाषा असण्यावरूनही जेव्हा अण्णादुराई राज्यसभेत प्रश्न उपस्थित करत होते तेव्हादेखील तुम्ही एकदाही अडवले किंवा शांत बसवले नाही किंवा देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना तुरूंगात टाकले नाही. कालांतराने अण्णादुराई यांनी आपली भूमिका बदलत तामिळनाडू भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जाहीर केले होते, याबद्दलच्या प्रसंगाचा उल्लेखही या पत्रात आहे.
(हा लेख आजच्या ‘दि इंडियन एक्सप्रेस’च्या अंकात ‘डिअर अटलजी वी मिस यू’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला आहे.)