पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय उलथापालथ झाल्याचं दिसत आहे. त्यात काँग्रेस दोन गट पडल्याचं दिसत आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनिष तिवारी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कौतुक करत सध्याच्या राजकारणावरून नवज्योत सिंग सिद्धूवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. पंजाबमध्ये सध्या जे काही होत आहे. यामुळे पाकिस्तान आणि आयएसआय खूश होत असल्याचं मनिष तिवारी यांनी सांगितलं. “पंजाबचा खासदार म्हणून पंजाबमध्ये होणाऱ्या घटनांमुळे दु:खी आहे. पंजाबमध्ये शांतता अत्यंत कठीण होती. १९८०-१९९५ मध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आणि पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी २५ हजार लोकांनी बलिदान दिलं. त्यात सर्वाधिक काँग्रेस कार्यकर्ते होते”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं. “पंजाबमध्ये राजकिय स्थिरता पुर्नस्थापित करणं गरजेचं आहे. नुकताच मी प्रादेशिक सुरक्षा परिषदेतून परतलो आहे आणि त्यात असं दिसतंय की, पंजाबमधील अस्थिरतेबाबत पाकिस्तान जास्त आनंदी असेल. जर पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता वाढली तर त्यांना पुन्हा आपला कट शिजवण्याची संधी मिळणार आहे”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं.
“पंजाब सीमावर्ती राज्य आहे. कृषी कायद्यांमुळे लोकांमध्ये याआधीच असंतोष आहे. या स्थितीत राजकीय घडामोडींमुळे पंजाबच्या शांततेवर सरळ प्रभाव पडेल”, असं मनिष तिवारी यांनी सांगितलं. “अमरिंदर सिंग यांनी जी भविष्यवाणी केली होती, ती खरी होताना दिसत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग मोठे नेते आहेत. ते माझ्या दिवंगत वडिलांचे जवळचे मित्र होते. आम्ही एकमेकांना दशकांपासून ओळखतो. राष्ट्रवाद त्यांच्या रक्तात आहे. यासाठी मला वाटतं की, या परिस्थितीत कॅप्टन अमरिंद सिंग यांनी चांगला निर्णय घेतला आहे. त्यांचा प्रत्येक निर्णय देश हितासाठी होता”, असंही त्यांनी सांगितलं.
दुसरीकडे, नवज्योत सिंग सिद्धू यांचं नाव घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यांना जबाबदारी देण्यात आली ते पंजाब समजू शकले नाहीत. कॅप्टन अमरिंदर एक जबाबदार नेते आहेत. त्यांचा राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे चांगले समजतात. त्यामुळे राजकीय स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करणं गरजेचं आहे. निवडणूक हा एक पैलू आहे. मात्र राष्ट्रहिताचा पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे”, असंही मनिष तिवारी यांनी पुढे सांगितलं.