देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त युवक काँग्रेसच्या माध्यमातून चंदीगडमधल्या सेक्टर १५मधील काँग्रेस भवन ते सेक्टर २५ पर्यंत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. नवनियुक्त पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

“पंजाबवर प्रेम करण्याऱ्यांना निवडणुकीदरम्यान शोपीससारखं वापरलं जातं. निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना बाजूला केलं जातं. त्याऐवजी नफा कमवण्यात रस घेण्याऱ्या लोकांना घेतलं जातं. मी तुम्हाला शब्द देतो. मी तुमच्यातील गुणवत्तेचा आदर करीन आणि तरुणांचा सन्मान करेन.”, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांनी यावेळी सांगितलं.

नवजोत सिंह सिद्धू यांनी शुक्रवारी १३ महानगरपालिकेतील काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केराची टोपली दाखवली होती. मुख्यमंत्री आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांनी या बैठकीला दांडी मारली. मंत्री ब्रह्म मोहिंदरा, मनप्रीत सिंह बादल आणि ओपी सोनी हे बैठकीला गैरहजर राहिले. तर बलबीर सिंह सिद्धू काही मिनिटाच बैठकीतून बाहेर पडले होते. चंदीगडमधील काँग्रेस भवनमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या बैठकीला नवजोत सिंह सिद्धू सव्वा तास उशिराने पोहोचले होते. या बैठकीत मंत्री भारत भूषण आशू, शाम सुंदर अरोरा, कुलजीत सिंह नागरा, तर राजिंदर बेरी, अमित विज, परगट सिंह आणि अश्विनी सेखरी यांच्यासह डझनभर आमदार उपस्थित होते.

Story img Loader