काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ भारत दौरा करत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून ही यात्रा तेलंगणा राज्यात पोहचली आहे. काल ( १ नोव्हेंबर ) ही यात्रा हैदराबाद शहरात होती. यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही सामील होत आहेत. त्यातच राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा तेलंगणातील यात्रेत सामील झाले होते. मात्र, यात्रेदरम्यान राऊत यांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
‘भारत जोडो यात्रे’त सामील झाल्यानंतर नितीन राऊत यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे ते खाली पडले आणि उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच, हात आणि पायालाही दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. नितीन राऊत यांना तत्काळ उपचारासाठी हैदराबादमधील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हेही वाचा : “चुलीत जाऊ द्या ती आमदारकी, डब्यात जाऊ द्या खासदारकी, कोण…”, नितेश राणे आक्रमक
राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भेट घेतली आहे. तसेच, राजेश लिलोथिआ, इम्रान प्रतापगडी, कन्हैया कुमार आणि तेलंगणाच्या काँग्रेस नेत्यांनी राऊत यांची भेट घेत विचारपूस केली आहे.
हेही वाचा : जळगावात सभा सुषमा अंधारेंची, मंचावरून राष्ट्रवादीच्या नेत्याची गुलाबराव पाटलांविरुद्ध तुफान फटकेबाजी
दरम्यान, ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पोहचणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा ११ दिवस चालणार आहे. महाराष्ट्रातील यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.