रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी मोठा निर्णय घेत २ हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या आहेत. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत आपल्याकडच्या २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. एकावेळी २० हजार रुपये म्हणजेच दोन हजारांच्या १० नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी २ हजार रुपयांची नोट वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केलाय. परंतु २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने “इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे कारण देत २ हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर केलाय.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोठं विधान केलं आहे. पी चिदंबरम ट्वीट करत म्हणाले, “अपेक्षेप्रमाणे, सरकारने किंवा आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट मागे घेतली आहे. आता नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दोन हजार रुपयांची नोट ही विनिमयासाठी योग्य नाही, हे आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये सांगितलं होतं. आमचं भाकीत खरं ठरलं आहे.”
“५०० आणि १००० रुपयांच्या नोटाबंदीच्या मूर्खपणाच्या निर्णयावर पांघरूण घालण्यासाठी दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. जुन्या नोटा लोकप्रिय होत्या आणि मोठ्या प्रमाणावर चलनांचं विनिमय केलं जात होतं. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर काही आठवड्यांत सरकार/आरबीआयला ५०० रुपयांची नोट पुन्हा चलनात आणावी लागली. त्यामुळे सरकारने एक हजार रुपयांची नोटही पुन्हा बाजारात आणली तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं नवीन भाकीत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केलं.
हेही वाचा- विश्लेषण : आरबीआयने २ हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या; आता तुमच्याकडील नोटांचं काय? वाचा…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० च्या नोटा वितरणातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. त्या आपल्याला दिलेल्या मुदतीपर्यंत जमा करता येणार आहेत. ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन ५०० आणि २००० च्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाईसुद्धा बंद केली होती.