भारतीय वंशाचे नागरिक आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता.

जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पेनी मॉर्डन्ट यांच्याकडे पाहिलं जात होतं. मात्र, सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे.

भारतीय वंशाच्या सुनक यांची ब्रिटनच्या सर्वोच्च पदी निवड झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम भारतातील बहुसंख्यवादाचं राजकारण करणाऱ्या पक्षांना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं, “आधी कमला हॅरिस आणि आता ऋषी सुनक… अमेरिका आणि ब्रिटनमधील नागरिकांनी त्यांच्या देशांतील बहुसंख्य नसलेल्या नागरिकांना स्वीकारलं आहे. त्यांना सरकारमधील उच्च पदावर निवडून दिलं आहे. भारत आणि बहुसंख्यवादाचं राजकारण करणाऱ्या पक्षांनी यातून धडा शिकायला हवा, असं मला वाटतं.”

हेही वाचा- भारतीय वंशाचे सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान! ‘ऋषी’ ब्रिटनच्या गडगडलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणार?

खरं तर, ऋषी सुनक दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. याआधी जुलै महिन्यात ते लिझ ट्रस यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. मात्र तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली होती. त्या निवडणुकीत लिझ ट्रस विजयी झाल्या. मात्र, पक्षाचा पाठिंबा गमावल्यामुळे तसेच दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे ट्रस यांना अवघ्या ४५ दिवसांत राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता ऋषी सुनक हे दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. यावेळी मात्र हुजूर पक्षातील खासदारांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाची शर्यत जिंकली आहे.

Story img Loader