काँग्रेस नेते पवन खेरा यांना आज(गुरुवार) दिल्ली विमानतळावर विमानमधून उतरवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ते उद्या(शुक्रवार) रायपुरमध्ये सुरू होणाऱ्या काँग्रेस अधिवेशनासाठी निघाले होते. यासंदर्भात माहिती देताना काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी ट्वीट केले. प्राप्त माहितीनुसार आसाम पोलिसांच्या विनंतीनंतर पवन खेरा यांना दिल्ली पोलिसांनी विमानात चढण्यापासून रोखले.
याबाबत काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, “आम्ही सर्वजण रायपूरला जाण्यासाठी इंडिगो विमानात बसलो होतो आणि अचानक माझे सहकारी पवन खेरा यांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले. ही कसली मनमानी आहे? हे कोणत्या आधारावर आणि कोणाच्या आदेशावरून केले जात आहे?”
याशिवाय काँग्रेसने संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देत ट्वीट केलं आहे. “सर्वजण विमानात बसले होते, त्याचवेळी आमचे नेते पवन खेरा यांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले. हा तानशाहीचे वागणे आहे. हुकूमशाहाने अधिवेशनाअगोदर इडीकडून छापेमारी केली आणि आता याप्रकारे वागलं जात आहे.”
आसाम पोलिसांच्या विनंतीवरून अडवलं –
दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, काँग्रेस नेता पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर विमानत बसण्यापासून रोखण्यात आलं. कारण, आसाम पोलिसांनी त्यांना थांबवण्याची विनंती केली होती. ज्यावेळी पवन खेरा यांना विमानातून उतरण्यात आलं, त्यावेळी त्यांच्याबरोबर रणदीप सुरजेवाला, केसी वेणुगोपाल यांच्याशिवाय अन्य काँग्रेस नेते होते. आरोप आहे की यावेळी त्यांना ताब्यात घेण्याचाही प्रयत्न झाला.
हिंडेनबर्ग अहवालानुसार उद्योगपती गौतम अदानी यांचा भ्रष्टाचार बाहेर आला आहे, तरीही त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरत आहेत, असा सवाल अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केला होता. याशिवाय पंतप्रधान मोदी अदानींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केलेला आहे.