विश्वास पुरोहित, अकोला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेवरील खर्चावरुन वाद निर्माण झाला असतानाच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. “हा राज ठाकरे यांच्याशी संबंधित प्रश्न आहे आणि तेच निवडणूक आयोगाला योग्य उत्तर देतील”, असे सांगत त्यांनी या वादावर अधिक भाष्य करणे टाळले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दुपारी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना राज ठाकरे यांच्या सभेवरील खर्चाच्या वादावर प्रश्न विचारण्यात आला. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी “हा राज ठाकरे यांचा प्रश्न आहे. ते बघून घेतील. निवडणूक आयोगाला ते योग्य उत्तर देतील” असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. साम, दाम, दंड भेद हे मुख्यमंत्र्यांचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असून भाजपाविरोधी मतांचे विभाजन करण्याचा हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात राज ठाकरे यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. नियमानुसार निवडणुकीच्या काळातील सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. पण यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपाची यावरुन आक्रमक झाली असून यासंदर्भात या प्रचारसभा कोणासाठी आहेत? या सभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खर्चात धरायचा?, असा प्रश्न विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून विचारला आहे.