सावरकर हे काही वीर नव्हते. जर मी प्रभारी असतो तर सुवर्ण विधानसभेत लावण्यात आलेला त्यांचा फोटो काढून टाकला असता. असं वक्तव्य कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी केलं आहे. प्रियांक खरगे यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खरगे यांच्या वक्तव्यावर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हटलं आहे प्रियांक खरगेंनी?
“सावरकरांचे योगदान काय? या विषयावर काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत मी दीड तास बोललो. सावरकरांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपाने सांगितलं पाहिजे. तसंच वीर ही पदवी सावरकरांना कुणी दिली? सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत नव्हते हे भाजपा सांगेल का? मी आज माझं मत मांडतो आहे. माझ्या हाती असतं तर विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. सावरकर अजिबात वीर नव्हते याबाबत मी आव्हान द्यायलाही तयार आहे.” असं प्रियांक खरगे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते बी के हरीप्रसाद यांनीही प्रियांक खरगे योग्य भूमिका मांडली आहे असं म्हटलं आहे. सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान शून्य आहे असंही ते म्हणाले. भाजपाची सत्ता आल्याने कर्नाटक विधानसभेत सावरकर यांचं चित्र लावण्यात आलं. भाजपाला इतिहास बदलायचा आहे. असा आरोप बी. के. हरीप्रसाद यांनी केला.
भाजपाने काय म्हटलं आहे?
कर्नाटक विधानसभेतून जर वीर सावरकर यांचं चित्र हटवण्यात आलं तर तीव्र निषेध नोंदवला जाईल असा इशाऱा भाजपा आमदार भरत शेट्टींनी दिला आहे. प्रियांक खरगे यांच्याकडे चुकीची माहिती आहे. मात्र त्यांना वाटते की ते सुशिक्षित लोकांपैकी आहेत. वीर सावरकरांचे चित्र काढण्याचा प्रयत्न केल्यास सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर तीव्र विरोध केला जाईल असा इशाराच भाजपाने दिला आहे.