काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्या मुलाचं छायाचित्र प्रदर्शन दिल्लीतील एका आर्ट गॅलरीत लागलं आहे. या छायाचित्र प्रदर्शनामुळे प्रियंका भावुक झाल्याचं दिसून आल्या. मुलाच्या पाठीवर कौतूकाची थाप देत प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. माझ्या मुलावर मला गर्व आहे, असे भावुक उद्गार प्रियंका गांधी वाड्रा यांनी काढले आहेत.
रेहानचं ‘डार्क परसेप्शन अँड एक्सपोजर ऑफ लाइट, स्पेस अँड टाइम’ या पहिल्या छायाचित्र प्रदर्शनाचं दिल्लीतील बिकानेर हाउसमध्ये आयोजित केलं आहे. हे प्रदर्शन १७ जुलैपर्यंत असणार आहे. या छायाचित्र प्रदर्शनात रेहाननं वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाशझोत टाकला आहे. छायाचित्र पाहिल्यानंतर प्रियंका गांधी यांनी मुलाच्या कामाचं कौतुक केलं आहे. “मला तुझा गर्व वाटतो, तू स्वत:चा मार्ग स्वत: निवडला. तुझं लक्ष्य गाठण्यासाठी तू मेहनत घेत आहेस. हे बघून मला आनंद वाटतो. (माफ कर शेवटी आई ही आई असतो).” अशी पोस्ट प्रियंका गांधी यांनी केली आहे. “रेहानचं पहिलं छायाचित्र प्रदर्शन आहे. ‘डार्क परसेप्शन अँड एक्सपोजर ऑफ लाइट, स्पेस अँड टाइम’ अशी संकल्पना आहे. हे प्रदर्शन दिल्लीतील बिकानेर हाउसमध्ये १७ जुलैपर्यंत असणार आहे”, असंही त्यांनी पुढे लिहिलं आहे.
View this post on Instagram
रेहान राजीव वाड्रा हा प्रियंका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा यांचा मुलगा आहे. रेहान इन्स्टाग्रामवर चांगलाच सक्रिय आहे. तो नेहमी त्याने काढलेली छायाचित्र सोशल मीडियावर टाकत असतो. त्याचे १३ हजार फॉलोअर्स आहे. त्याने टाकलेल्या छायाचित्रांना हजारोने लाइक्स मिळतात. या प्रदर्शनाचं औचित्य साधत रेहनानं त्याच्या ‘डार्क परसेप्शन’ या पुस्तकाचं लोकार्पण सुद्धा केलं आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
रेहान राजीव वाड्रा हा २० वर्षांचा असून सध्या लंडनमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. रेहानला लहानपणापासूनच छायाचित्र काढण्याचा छंद आहे. “माझ्या आईला मी काढलेली छायाचित्र खूप आवडतात. मला लहानपणापासूनच जंगलातील झाडं झुडपं आणि प्राण्यांचे छायाचित्र काढत होतो. तसेच शालेय शिक्षणात स्ट्रीट फोटोग्राफीसुद्धा केली आहे”, असं रेहाननं सांगितलं.