Priyanka Gandhi : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल ‘Poor Lady’ असा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. या आरोपाला आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रियांका गांधी यांनी एका सभेत बोलताना म्हटलं की, “निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न म्हणजे महागाई आणि बेरोजगारीच्या समस्यांशी झगडणाऱ्या लोकांचा अपमान आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी नेहरूजींमुळे काम करू शकत नाही. अरविंद केजरीवाल म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मी काम करू शकत नाही. मी माझ्या आयुष्यात असे रडणारे नेते कधी पाहिले नाहीत”, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. यासंदर्भातील वृत्त बिझनेस स्टॅंडर्डने दिलं आहे.
दरम्यान, सोनिया गांधींवर भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या टीकेनंतर प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रियांका गांधी यांनी म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणाले की माझ्या आईने राष्ट्रपतींचा अपमान केला. त्यांनी कोणता मुद्दा उपस्थित केला? एक वृद्ध महिला दुसऱ्या वृद्ध महिलेबद्दल सहानुभूती व्यक्त करताना बिचाऱ्या राष्ट्रपती थकल्या असतील. कारण त्यांना तासाभराचे भाषण वाचावं लागलं असं म्हटलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की राष्ट्रपतींचा हा अपमान आहे. पण देशातील संघर्ष करणाऱ्या जनतेचा ते अपमान करत आहेत. महागाईमुळे जनता त्रस्त आहे. अनेकांना पेन्शन मिळत नाही, सफाई कर्मचारी त्रस्त आहेत. पण इकडे पंतप्रधान मोदी हे अशा पद्धतीने निवडणुकीचा मुद्दा बनवतात”, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांचा रडणारे नेते असा उल्लेख केल्यामुळे आता यावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.