मंडला : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली तर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल तसेच शालेय विद्यार्थ्यांना भत्ता दिला जाईल, असे आश्वासन पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी गुरुवारी दिले. राज्यातील मंडला या आदिवासीबहुल जिल्ह्यातील जाहीर प्रचारसभेत त्यांनी जातीनिहाय जनगणनेच्या आश्वासनाचाही पुनरुच्चार केला.
हेही वाचा >>> मध्य प्रदेश-राजस्थान-छत्तीसगढमध्ये स्थानिक नेतृत्व भाजपच्या यशातील अडचण?
प्रियंका म्हणाल्या की, ‘बिहारमध्ये अलीकडेच झालेल्या जातीनिहाय सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले की, ८४ टक्के लोक ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत. पण नोकऱ्यांमधील त्यांची संख्या अतिशय कमी आहे. त्यांची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी देशात जातीनिहाय जनगणना केली जाईल.’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये भत्ता, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १,००० रुपये भत्ता तसेच अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १,५०० रुपये भत्ता दिला जाईल, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.