करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा भारताला बसल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. या दरम्यान लसीच्या मागणीइतका पुरवठा होत नसल्यामुळे लसींचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी केल्या. अनेक ठिकाणी तर लसींच्या तुटवड्यामुळे काही काळ लसीकरण मोहीम स्थगित देखील करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लसीकरण मोहिमेवरून परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. तसेच, इतर देशांना हे जमलं, तर आपल्याला हे का जमू शकलं नाही? असा परखड सवाल देखील त्यांनी केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२० रोजी केलेल्या घोषणेची देखील आठवण प्रियांका गांधींनी करून दिली आहे.
ट्वीटरवर व्हिडीओ केला पोस्ट!
प्रियांका गांधी यांनी आपला एक व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी देशातील सध्याच्या लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली आहे. “केंद्रानं (लस खरेदी, वितरणाबाबत) सुरुवातीला सर्व जबाबदारी घेतली. पण जशी करोनाची दुसरी लाट देशात सुरू झाली, तसं केंद्र सरकारने ही जबाबदारी राज्य सरकारांकडे द्यायला सुरुवात केली. जर्मनी, अमेरिका या देशांनी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीचा स्वीकार केला. तिथे केंद्र सकरारने लसी खरेदी केल्या आणि राज्यांना त्या लसी फक्त वितरीत करण्याची जबाबदारी दिली. पण मग मोदी सरकारने असं का केलं नाही?” असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
फक्त ३.४ टक्के लोकसंख्येलाच लसीकरण!
“भारत हा जगात लसींचं सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक आहे. मात्र, तरीही आज देशातली फक्त ३.४ टक्के लोकसंख्या पूर्णपणे लसीकृत आहे. भारताच्या या अशा संभ्रमित आणि अनिश्चित लसीकरण मोहिमेसाठी कोण जबाबदार आहे?”, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
We are one of the biggest vaccine manufacturers in the world. Yet only 3.4% of our population is fully vaccinated.
Who is responsible for India’s confused and dithering vaccination program?#SpeakUpForFreeUniversalVaccination pic.twitter.com/9JRgc1QSIo
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 2, 2021
“मोदी सरकारने देशाला दलदलीत ढकलले,” प्रियांका गांधींनी मोदींना विचारले तीन प्रश्न
‘त्या’ घोषणेचं काय झालं?
दरम्यान, गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०२० रोजी ऐन करोनाच्या पहिल्या लाटेच्या मध्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना केलेल्या घोषणेची आठवण यावेळी प्रियांका गांधी यांनी करून दिली आहे. “१५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की प्रत्येक भारतीयाला पुढच्या वर्षापर्यंत लसीकृत करण्याची आपली योजना तयार आहे. पण आता आपण २०२१च्या मध्यापर्यंत आलो आहोत. सध्या आपलं लसीकरणाचं प्रमाण प्रतिदिन जवळपास १९ लाख डोसचं आहे. पंतप्रधानांनी दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण दिवसाला किमान ७० ते ८० लाख लोकांना लस द्यायला हवी”, असं त्या म्हणाल्या.