लोकसभेची निवडणूक सध्या सुरु आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. असे असतानाच काँग्रेसला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राधिका खेरा यांनी ट्विटरवर काय म्हटलं?
“आज मी अत्यंत दुःखाने पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा आणि माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. होय, मी एक मुलगी आहे आणि मी लढू शकते. मी आता तेच करत आहे. मी माझ्या आणि माझ्या देशवासीयांच्या न्यायासाठी लढत राहील”, असे राधिका खेरा यांनी एक्सवर (ट्विटरवर) केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
राधिका खेरा यांनी पत्रात काय म्हटलं?
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राधिका खेडा यांनी एक पत्र लिहिले असून त्यांनी पत्रात म्हटले आहे की, “प्राचीन काळापासून धर्माचे समर्थन करणाऱ्यांना विरोध करण्यात येत आहे. हिरण्यकशिपूपासून ते रावण आणि कंसापर्यंत अनेक अशी उदाहरणे आहेत. प्रभू श्री रामाचे नाव घेणाऱ्यांना काही लोक विरोध करत आहेत. मात्र, प्रत्येक हिंदुसाठी श्री राम जन्मभूमी पवित्र स्थान आहे. मी ज्या पक्षामध्ये माझ्या आयुष्यातील २२ वर्षांपेक्षा जास्त वर्षे दिली, पक्षात काम केले. मात्र, आज मला त्याच पक्षाच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. मला एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे की, छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कार्यालयात मला न्याय मिळाला नाही. मी प्रत्येकांना न्याय मिळून देण्यासाठी लढले. पण आज माझ्याच पक्षात माझा पराभव झाला. पक्षाच्या वरिष्ठांना सांगूनही न्याय न मिळाल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे”, असे राधिका खेडा यांनी पत्रात म्हटले आहे.