पीटीआय, लेह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लडाखमध्ये चीनने एक इंचही जमीन ताब्यात घेतली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य असत्य असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. चिनी लष्कराने येथील चराऊ जमिनी ताब्यात घेतल्या असून त्यामुळे लडाखवासीय चिंताग्रस्त असल्याचे लडाखच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी सांगितले.

आपले पिता आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल म्हणाले, की सर्व लडाखवासीयांच्या म्हणण्यानुसार चिनी सैन्याने घुसखोरी करून आमच्या चराऊ जमिनी (कुरणे) ताब्यात घेतल्या आहेत. आता तेथे आम्हाला जाता येत नसल्याचे ते स्पष्ट सांगत आहेत. त्यामुळे चीनने एक इंचही जमीन ताब्यात घेतली नसल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा असत्य आहे.

राहुल यांनी सांगितले की, ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान लडाखला भेट देण्याचा आपला मानस होता. परंतु काही कारणांमुळे त्यावेळी लडाखला भेट देता आली नाही. म्हणून मला लडाखचा दीर्घ दौरा करावा, असे वाटले. मी पँगॉन्गला आलो. त्यानंतर नुब्रा आणि कारगिलला भेट देणार आहे. येथे लडाखवासीयांचे म्हणणे काय आहे आणि त्यांच्या चिंता-व्यथा जाणून घेण्याचा माझा उद्देश आहे.

पूर्व लडाखमध्ये काही तणावग्रस्त भागांत भारतीय आणि चिनी सैन्य तीन वर्षांहून अधिक काळ समोरासमोर तैनात आहे. तर दोन्ही बाजूंनी सविस्तर राजकीय आणि लष्करी वाटाघाटीनंतर अनेक भागांतून दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्याचे काम पूर्ण केले आहे. जोपर्यंत सीमाभागात शांतता नांदत नाही तोपर्यंत चीनसोबतचे संबंध सामान्य होऊ शकत नसल्याचे भारताने सातत्याने स्पष्ट केले आहे.

लडाखमध्ये प्रमुख चिंता चीनच्या अतिक्रमणाची आहे. चराऊ जमीन चीनच्या ताब्यात गेल्याने येथील रहिवाशांना तेथे जाता येत नाही. त्याचा मोठा फटका बसला आहे. येथे मोबाईल संपर्कव्यवस्थाही नीट नाही. काँग्रेसने चीनच्या अतिक्रमणाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे. – राहुल गांधी, काँग्रेसचे नेते