लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या आधी दिल्लीत अटीतटीचं राजकारण पाहण्यास मिळतं आहे. एनडीएच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ मात्र आमची एक अट मान्य असली पाहिजे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांचं नाव पुन्हा एकदा लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पुढे करण्यात आलं आहे. अशात राहुल गांधी आणि काँग्रेसने ही अट ठेवली आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. फोनवरुन राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठीच्या एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. आम्ही विनंती मान्य करुन एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, पण लोकसभेचं उपसभापति पद मात्र विरोधकांना मिळालं पाहिजे. मल्लिकार्जुन खरगे यांना फोन परत करणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी काल सांगितलं होतं. मात्र त्यांनी फोन केला नाही. सहकार्य हवं, असं पंतप्रधान मोदी सांगत आहेत. मात्र, आमच्या नेत्याचा अपमान केला जात आहे. सरकारचा हेतू स्पष्ट नाही.
दुसरीकडे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही विरोधक सभापतीपदासाठी पाठिंबा देण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र उपसभापतीपद आम्हाला मिळावं हीच आमची मागणी स्पष्ट आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
राजनाथ सिंह काय म्हणाले?
मल्लिकार्जुन खरगे हे वरिष्ठ नेते आहेत. कालपासून आजपर्यंत तीनवेळा त्यांच्याशी आमचं फोनवरुन बोलणं झालं आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडतंय दिल्लीत?
ANI च्या माहितीनुसार एनडीएनं ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाचं उमेदवार बनवलं आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बुधवारी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. जर विरोधकांनी सभापतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर निवडणूक होणार नाही. विरोधकांना उपसभापतीपद हवं असून ते सभापतीपदासाठी उमेदवार देण्याच्या बाजूनं नसल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारच्या वतीनं राजनाथ सिंह सातत्यानं विरोधकांशी चर्चा करत आहेत.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी बोलून सभापती निवड बिनविरोध करण्याचं आवाहन केलं आहे आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, सभापती बिनविरोध निवडण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे. मात्र, राजनाथ सिंह यांनी अद्याप या नावाचा खुलासा केलेला नाही. नाव समोर आल्यानंतर खर्गे इंडिया आघाडीच्या उर्वरित पक्षांशी चर्चा करतील. सभापतींची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.