काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकशाही, राजकारणात सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराबाबत लोकसभेत चिंता व्यक्त केली. सोशल मीडियाचा हा गौरवापर लोकशाहीसाठी घातक असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेसबूक भाजपासाठी सोईस्कर भूमिका घेत असल्याची टीका ट्विटच्या माध्यमातून केली. तसेच मेटा अर्थात फेसबूक लोकशाहीसाठी वाईट असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

राहुल गांधी यांनी फेसबुककडून भाजपासाठी पुरक असणारी भूमिका घेतली जातेय, असा आरोप केलाय. त्यासाठी त्यांनी अल जजीरा या आंतरराष्ट्रीय माध्यमातील काही लेखांचे कात्रण आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. निवडणुकीदरम्यान फेसबुक भाजपाकडून इतर पक्षांच्या तुलनेत कमी पैसे घेते, रिलायन्सकडून आर्थिक पुरवठा केलेल्या फर्मकडून भाजपच्या बाजूने फेसबूकवर कशा प्रकारे मोहीम चालवली जातेय, हे सांगणाऱ्या लेखांचे शीर्षक त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत. तसेच या कात्रणांसोबत त्यांनी मेटा म्हणजेच फेसबूक लोकशाहीसाठी वाईट आहे, अशी टीका केलीय.

तर दुसरीकडे आज लोकसभेत सोनिया गांधी यांनी याच विषयावर आपलं मत मांडलं. “जागतिक समाजमाध्यमे सर्वांसाठी समान संधी देत नाहीत. ही बाब सर्वांच्याच निदर्शनास आलेली आहे. फेसबुककडून सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे,” असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय.

चुकीची माहिती देऊन तरुण तसेच वृद्धाच्या मनात द्वेष पेरला जातोय. ही बाब फेसबुक तसेच अन्य जाहीरात कंपन्यांना माहिती आहे. लोकांच्या मनात द्वेष पेरून या कंपन्या नफा मिळवत आहेत, असा आरोप सोनिया गांधींनी केला. त्याचबरोबर त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील निवडणुकीच्या राजकारणात फेसबूक तसेच इतर समाजमाध्यमांचा हस्तक्षेप थांबवावा, असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी यावर अंकुश घालण्याचे आवाहन केले.