राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी बोलणार आहेत. आज ओम बिर्ला यांचं अभिनंदन करताना राहुल गांधी यांनी पुढे होणाऱ्या संघर्षाची चुणूकही दाखवून दिली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी व्हिडीओ पोस्ट करत जनतेचे आभार मानले आहेत.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगलं यश

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने आम्ही एनडीएसह ४०० पार जाणार असा नारा दिला होता. मात्र भाजपाला २४० जागा मिळवता आल्या. तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. काँग्रेसला देशभरात ९९ जागांवर यश मिळालं. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये भाजपाला फटका बसला आहे. त्याचा परिणाम निश्चितच लोकसभा निवडणुकीवर झाला. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आलं आहे. दोन दिवसांपासून लोकसभेत खासदारांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर राहुल गांधी यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

देशातील जनतेला, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, इंडिया आघाडीच्या नेत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला कुणीतरी विचारलं की माझ्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचा अर्थ काय? त्यावर मी म्हणालो की लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणजे लोकसभेतला तुमचा आवाज आहे. तुमच्या मनातल्या भावना, तुमचे प्रश्न, समस्या आहेत त्या विरोधी पक्षनेतेपदाच्या माध्यमातून मी मांडेन. देशातले गरीब लोक, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, शेतकरी, कामगार असो समाजातला कुठलाही घटक असो मी तुमचाच आहे. या आशयाचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे.

राहुल गांधी म्हणाले तुमचा आवाज

राहुल गांधी म्हणाले, संविधानामुळे तुमचं संरक्षण होतं आहे. जर सरकारने संविधानावर आक्रमण केलं, संविधान वाकवण्याचा प्रयत्न केला तर तिथे पूर्ण ताकदीने आम्ही संविधानाचं रक्षण करणार. मी तुमचा आवाज संसदेत बनून संसदेत काम करणार अशी गॅरंटीही राहुल गांधीनी दिली.

हे पण वाचा- ओम बिर्लांचं अभिनंदन करताना राहुल गांधींची टोलेबाजी; म्हणाले, “संख्याबळ तुमच्याकडे आहे पण..”

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींचं हस्तांदोलन

राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर ओम बिर्ला यांचं अभिनंदन केले. त्यांना त्यांच्या आसन व्यवस्थेपर्यंत नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि संसदीय कार्यमंत्री रिजिजू गेले होते. यावेळी राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन केले. दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक काळात एकमेकांवर तुफान हल्लाबोल केला होता. राहुल गांधींचा उल्लेख मोदींना ‘शहजादा’ असा केला होता. तर पंतप्रधान मोदी हे तिरस्कार पसरवत आहेत, आमची लढाई विचारधारांची आहे असं राहुल गांधी म्हणाले होते. याशिवाय इतर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं.