काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेची निवडणूक उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघामधून लढवली होती. या दोन्हीही मतदारसंघात राहुल गांधी यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. मात्र, आता काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून राजीनामा देणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधी आता उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून खासदार राहणार आहेत.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ राहुल गांधी यांनी सोडल्यानंतर आता त्या मतदारसंघामधून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या पोटनिवडणूक लढवणार आहेत. याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाची खासदारकी सोडताना वायनाडमधील जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच प्रियंका गांधी त्या मतदारसंघामधून पोटनिवडणूक लढवणार असल्यामुळे आम्ही जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं.
LIVE: Press Conference | New Delhi https://t.co/8MmMVPgPfi
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 17, 2024
हेही वाचा : राहुल गांधींचा लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदास नकार? ‘या’ तीन तडफदार नेत्यांच्या नावांची चर्चा
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
“काँग्रेसचे नेते राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, नियमाप्रमाणे एक मतदारसंघ सोडावा लागतो आणि एका मतदारसंघामधून कायम राहता येतं. यासंदर्भातील निर्णय घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आम्ही आज बैठक घेत यासंदर्भातील निर्णय घेत रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी खासदार राहतील असा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत”, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.
प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार
राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभेची खासदारकी कायम ठेवली. त्यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघामधून प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी म्हणाल्या, “वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळत असल्यामुळे मी खूष आहे. तसेच आमचं रायबरेली आणि वायनाडच्या जनतेशी एक नात आहे”, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, लोकसभा निवडणकीच्या प्रचारात प्रियंका गांधी यांनी देशभरात सभा घेतल्या होत्या. मात्र, त्या स्वत: निवडणूक लढवली नव्हती. मात्र, आता त्या वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत.
रायबरेलीमधून राहुल गांधींचा ४ लाख मतांनी विजय
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. तर एनडीए आघाडीला २९२ जागा मिळाल्या. एनडीएला बहुमत मिळाल्यामुळे केंद्रात एनडीचं सरकार स्थापन झालं आहे. तर लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसल्याचंही पाहायला मिळालं. मात्र, लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा दोनही मतदारसंघामधून मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला. त्यामध्ये रायबरेलीमधून राहुल गांधींचा तब्बल ४ लाख मतांनी विजय झाला. आता राहुल गांधींनी रायबरेलीमधून आपली खासदारकी कायम ठेवली आहे.