लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध सभेत बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या टीकेला काँग्रेस नेते राहुल गांधी प्रत्युत्तर देत आहेत. निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होतील, तेव्हा इंडिया आघाडीला बहुमत मिळेल. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून निसटत आहे”, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
“देशातील तरुणांनो! ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. आम्ही तुम्हाला गॅरंटी देत आहोत की, १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू”, असं आश्वासन राहुल गांधींनी देशातील युवकांना दिलं. याचवेळी राहुल गांधी यांनी देशातील युवकांना एक सल्लाही दिला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा. इंडिया आघाडीचे ऐका, द्वेष करू नका आणि नोकरी निवडा”. असे राहुल गांधी म्हणाले आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत भारतीय जनात पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की, दोन कोटी तरुणांना रोजगार देण्यात येईल. मात्र, ते खोटं बोलले होते. त्यांनी नोटबंदी केली. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लावला. मोदी सरकार उद्योगपती अदानी यांच्यासारख्या लोकांसाठी काम करत आहे. मात्र,आम्ही भरती भरोसा स्किम आणत आहोत. देशात ४ जून रोजी इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख तरुणांना रोजगार देण्याचं काम सुरु होईल”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
“नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान होणार नाहीत”, असा दावा राहुल गांधी यांनी केला. देशात आतापर्यंत झालेल्या निवडणुकीच्या तीन टप्प्यांच्या अंदाजावरून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाने ४०० पार खासदारांचा संकल्प केला आहे. तसेच भाजपाचे नेते प्रत्येक सभेत बोलताना ४०० पारचा नारा देत आहेत. एकीकडे भाजपाचा ४०० पार खासदारांचा नारा आणि दुसरीकडे इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येत असल्याचा राहुल गांधींचा विश्वास, हे पाहता देशात नेमकी सत्ता कोणाची येणार हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत असून यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल आणि ७ मे रोजी अशा तीन टप्प्यांतील निवडणुका पार पडल्या आहेत. यानंतर आता पुढच्या राहिलेल्या टप्प्यांतील मतदानासाठी इंडिया आघाडी आणि भाजपामध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे देशवाशियांचे लक्ष हे ४ जूनच्या निकालाकडे असणार आहे.