मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी चांगलेच सक्रीय झाले आहेत. ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा हजारो किलोमीटरचा प्रवास केला. त्यांची ही यात्रा देशभरात चर्चेचा विषय ठरली. या यात्रेमुळे राहुल गांधी यांचे राजकारणातील वजन वाढले असल्याचे मत राजकीय जाणकार मांडतात. दरम्यान, त्यांनी आज (२६ फेब्रुवारी) काँग्रेसच्या रायपूर येथील तीन दिवसीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच आपल्या घराबद्दल बोलताना ते भावूकही झाले. माझ्याकडे मागील ५२ वर्षांपासून स्वत:चे घर नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं जेवणाचं बील २ कोटी ३८ लाख रुपये! अजित पवार संतापले; म्हणाले “चहात काय…”
५२ वर्षे झाले माझ्याजवळ घर नाही
“जेव्हा मी ६ वर्षांचा होतो, तेव्हा मला निवडणुकीबद्दल काहीही माहिती नव्हते. एके दिवशी घरात वेगळेच वातावरण होते. तेव्हा मी आईजवळ गेलो आणि नेमकं काय झालं? असं विचारलं. आपण हे घर सोडत आहोत, असे त्यावेळी मला आई म्हणाली. ते घर माझेच आहे, असे मी समजत होतो. मी आईला पुन्हा विचारले की, आई आपण आपलेच घर का सोडत आहोत? तेव्हा मला आईने सांगितले की, राहुल हे आपले घर नाही. हे सरकारचे घर आहे. आता आपल्याला या घरातून जायचे आहे. मी पुन्हा विचारले की, आता आपल्याला कुठे जायचे आहे? आई म्हणाली मला माहिती नाही. मी परेशान झालो. ते आमचेच घर आहे, असे मी समजत होतो. आता ५२ वर्षे झाले माझ्याजवळ घर नाही. सद्यस्थितीला माझ्याकडे घर नाही,” अशी आठवण राहुल गांधी यांनी सांगितली. यावेळी राहुल गांधी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा >>> “सोनिया गांधी राजकारणातून…”, संन्यास घेण्याच्या वृत्तावर काँग्रेस प्रवक्त्याचं मोठं विधान
दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारत जोडो यात्रेवरही भाष्य केले. या यात्रेमुळे माझ्यातील अहंकार नष्ट झाला, असे राहुल गांधी म्हणाले. “चार महिने कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा आम्ही काढली. व्हिडिओत तुम्ही माझा चेहरा पाहिला. आमच्यासोबत लाखो लोकं चालत होते. प्रत्येक राज्यात लोक आमच्यासोबत चालले. उन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता लोक भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रा मला खूप काही शिकवून गेली. भारत जोडो यात्रेमुळे माझा अहंकार नष्ट झाला,” असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं.