काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणात उडी घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हं दिसत आहेत. पेगॅसस हेरगिरी संदर्भात राहुल गांधी यांनी ट्वीट केल्याने येत्या काळात या मुद्द्यावरून राजकारण तापणार, हे स्पष्ट आहे. पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील पत्रकार, नेते आणि प्रतिष्ठीत लोकांचे फोन हॅक केल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मीडियात सुरु आहे. इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या हॅकिंग सॉफ्टवेअर पेगॅससचा यासाठी वापर केल्याचं बोललं जात आहे.

“आम्हाला माहिती आहे की, ते काय वाचत आहेत. जे पण तुमच्या फोनमध्ये आहे”, असं ट्वीट करत राहुल गांधी यांनी पेगॅसस असा हॅशटॅग टाकला आहे.

काँग्रेस हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार आहे. “आपली राष्ट्रीय सुरक्षेवर संकट आहे. आम्ही हा मुद्दा संसदेत उपस्थित करू”, असं लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्यसभेत सीपीआय नेते बिनॉय विश्वम, राजद खासदार मनोज झा, आप खासदार संजय सिंह यांच्यासह अन्य खासदारही हा मुद्दा संसदेत उपस्थित करणार आहेत.

‘पेगॅसस’ काय आहे?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

Story img Loader