देशात करोना दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेची बिकट अवस्था आहे. या स्थितीमुळे विरोधकांनी सरकारवर टीकेचा भडिमार सुरु केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रोजच ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधत आहेत. करोना लसीवरील जीएसटी, सेंट्रल विस्टा प्रकल्प, पेट्रोल डिझेल दरवाढ या सारख्या अनेक विषयांवर ते ट्वीटच्या माध्यमातून सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. सध्या गंगेत वाहण्याऱ्या मृतदेहांचा प्रश्न ऐरणीवर आहे. हा मुद्दा समोर ठेवून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
‘जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है’, असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी गंगा घाटावर पूजा केली होती. त्यावेळेस त्यांनी माँ गंगेनं बोलवल्याचं विधान केलं होतं. या विधानाचा धागा पकडत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना खडे बोल सुनावले आहेत.
जो कहता था गंगा ने बुलाया है,
उसने माँ गंगा को रुलाया है। pic.twitter.com/ArGeuxVmEN— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 15, 2021
दोन दिवसांपूर्वी त्यांनी लस, ऑक्सिजन आणि औषधांसह पंतप्रधान बेपत्ता असल्याची टीका केली होती. तर सध्या सेंट्रल विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि पंतप्रधानांचे फोटो दिसताहेत, अशी बोचरी टीका त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली होती.
करोनाचं अरिष्ट! गंगेत वाहून आलेल्या शेकडो मृतदेहांमागील ही आहेत कारणं
उत्तर प्रदेशमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच राज्यामध्ये करोना मृतांची आकडेवारी सरकारकडून लपवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारच्या करोना मृतांच्या आकडेवारीसंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे.