सध्या पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा मुद्दा चांगलाच चर्चेत येत आहे. तर, आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार असल्याने पार्टी हायकमांडून या कलहावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पंजाबमधील आमदारांशी दिल्लीत चर्चा होणार आहे. काँग्रेस आमदार व राहुल गांधी यांची भेट दिल्लीतील राहुल गांधींच्या निवासस्थानी होणार आहे.

पंजाब काँग्रेसमधील असंतोषाच्या मुद्य्यावर मागील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री अमिरदर सिंग, त्यांचे स्पर्धक नवज्योतसिंग सिद्धू, इतर नेते-आमदार यांनी दिल्लीत हजेरी लावली आणि आपापले म्हणणे श्रेष्ठींनी नेमलेल्या समितीपुढे मांडलेले आहे. त्यामुळे आज काँग्रेस आमदार व राहुल गांधी यांच्यात होणाऱ्या बैठकीकडे व त्यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

पंजाब प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी संपवण्याच्या उद्देशाने अ.भा. काँग्रेस समितीतर्फे स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यांच्या समितीने तिचा अहवाल गुरुवारी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना सादर केल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब प्रदेश काँग्रेसबाबतचा अहवाल सोनिया गांधी यांना सादर

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व पंजाबचे प्रभारी हरीश रावत आणि माजी खासदार जे.पी. अगरवाल यांचा समावेश होता. पंजाबमध्ये पुढील वर्षी होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समितीने यापूर्वी राज्यातील अनेक नेत्यांशी विचारविनिमय केला.

Story img Loader