लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. आता एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. एनडीच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. तर इंडिया आघाडीच्याही काही बैठका पार पडल्या आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज मानहानीच्या प्रकरणात विशेष न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यासाठी ते आज सकाळीच बंगळुरूसाठी रवाना झाले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह काही भाजपा नेत्यांच्या विरोधात प्रमुख वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. त्या जाहिरातीमध्ये सर्व सार्वजनिक कामात ४० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तसेच काँग्रेसने भ्रष्टाचार दर कार्डही त्या माध्यमातून प्रसिद्ध केले होते. त्या जाहिरातीत राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने २०१९-२३ सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
#WATCH | Congress leader Rahul Gandhi reaches Delhi airport. He will shortly leave for Bengaluru to appear before a special court in a defamation case.
— ANI (@ANI) June 6, 2024
The Court has asked Rahul Gandhi to appear before it on June 7 in connection with a defamation lawsuit brought by the Karnataka… pic.twitter.com/Kc4ZxWRC4c
राहुल गांधी यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर या जाहिराती खोट्या असल्याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर या प्रकरणात कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रांमध्ये अपमानास्पद जाहिराती दिल्याबद्दल काँग्रेसवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू होती. यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांना ७ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार आहेत. दरम्यान, याच मानहानीच्या खटल्यात १ जून रोजी न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, राहुल गांधी यांना या प्रकरणात न्यायालयाने हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज राहुल गांधी सकाळी १०.३० वाजता शहर दिवाणी न्यायालयात हजर राहणार आहेत, अशी माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे. तसेच यानंतर राहुल गांधी कर्नाटकमधील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार आणि राज्यातील पराभूत उमेदवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार भेट घेणार
राहुल गांधी हे आज कर्नाटकच्या दौऱ्यावर असून कर्नाटक येथील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार आणि राज्यातील पराभूत उमेदवारांशी चर्चा करतील. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्याबरोबरी चर्चा करणार असून काही महत्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे. तसेच त्यानंतर राहुल गांधी पुन्हा दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.