Congress Leader Raja Pateriya Arrested: काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हत्येसाठी तयार राहा असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी राजा पटेरियांना मध्य प्रदेशातील दामोह येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजा पटेरिया नेमकं काय म्हणाले होते?

जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे असं राजा पटेरिया म्हणाले होते. “नरेंद्र मोदी निवडणूक संपवतील; धर्म, जात, भाषेच्या आधारे सर्वाचं विभाजन करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांना धोका आहे. जर आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहिलं पाहिजे,” असं ते म्हणाले. दरम्यान यानंतर त्यांनी हत्या म्हणजे पराभव असं सांगत सावरण्याचाही प्रयत्न केला.

“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा,” वरिष्ठ काँग्रेस नेत्याचं सभेत धक्कादायक विधान

दरम्यान गुन्हा दाखल होताच पटेरियांनी स्पष्टीकरण दिलं होतं. ते म्हणाले होते “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझा हत्‍या किंवा ह‍िंसेत विश्वास नाही. मला माझ्या वक्तव्यातून मोदींचा पराभव करावा लागेल असं सांगायचं होतं”.

हे वक्तव्य म्हणजे षडयंत्र – शिवराज सिंह चौहान

राजा पटेरिया यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या वक्तव्याला षडयंत्र म्हणून पाहिलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं होतं. शिवराज सिंह म्हणाले होते “राजा पटेरिया यांनी केवळ वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही, तर हे एक षडयंत्र आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्याची हत्या करावी लागेल अशा शब्दांचा वापर का? ते या वक्तव्यातून अगदी स्पष्टपणे लोकांना भडकावत आहेत. याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात याचा कधी विचार केलाय का?”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader raja pateria arrested over kill pm narendra modi remark sgy