प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर रविवारी भाजपाला कारवाई करावी लागली. एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. शर्मा यांना पक्षाने निलंबित केले. यानंतर आता काँग्रेसकडून भाजपावर टीका करणयात येत आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपाने उचललेले पाऊल प्रामाणिक व मनापासून आहे असे म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे. “फारच उशीर झालेली जाणीव जितकी जास्त काळ टिकेल तितके देशाचे भले होईल. भाजपा नेत्यांकडून इतर धर्म व पंथांविरुध्द टोमणे, खोडसाळपणा, धोरणे, कृती सर्रास झाल्या आहेत. नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाई पुरेशी नाही. पंतप्रधान, गृहमंत्री व आदित्यनाथांपासून सुरू होणारी मोठी यादी आहे,” असे सचिन सावंत म्हणाले.
भाजपाला आखाती देशांकडे माफी मागावी लागत आहे – संजय राऊत
“इस्लामिक देशांनी काही पावले उचलल्यानंतर भाजपाने उचललेले पाऊल प्रामाणिक व मनापासून आहे असे म्हणता येणार नाही. देशाचे सर्वोत्तम हित हे सर्व समुदायांमधील शांतता आणि सौहार्दात आहे. हा गांधीजींचा भारत आहे आणि ते म्हणतात की मोदी सरकारने भारताला लाज वाटेल असे केले नाही,” असेही सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरण मागितले. अरब देशांमध्ये ट्वीटरवर ‘‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’’, असा हॅशटॅग चालवण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. कतारने तेथील भारतीय राजदूतांना पाचारण करून नुपूर शर्मा यांच्या टिप्पणीबद्दल एका निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला. कतारच्या परराष्ट् विभागाने रविवारी सांगितले की, भारतात भाजपानेत्यांकडून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल विचारणा करण्यासाठी आम्ही भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना पाचारण केले होते. या पूर्णत: अस्वीकारार्ह, निषेधार्ह विधानाबाबत आम्ही त्यांना निवेदन दिले आहे. धार्मिक व्यक्तीमत्त्वांबाबत भारतातील काही व्यक्ती अवमानकारक वक्तव्ये करीत असल्याबद्दल त्यांच्याकडे आम्ही चिंता व्यक्त केली आहे. यावर भारतीय राजदूतांनी स्पष्ट केले की, ही विधाने कोणत्याही प्रकारे भारत सरकारचे मत नाही, तर ती काही दुय्गम घटकांचे मत आहे. भारतीय परंपरेनुसार भारत सरकार सर्वच धर्मपंथांचा सन्मान करते. अशा विधानांबाबत संबंधितांवर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले.