आगामी निवडणूक पानिपतसारखीच, असे सांगणाऱ्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी चिमटा काढला आहे. पानिपतचे युद्ध हे विजयासाठी नव्हे तर पराभवासाठी ओळखले जाते, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दिल्लीत भाजपाच्या दोन दिवसांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या परिषदेला शुक्रवारी सुरुवात झाली असून या परिषदेत अमित शाह यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. आगामी लोकसभा निवडणूक पानिपतासारखीच असून ती भाजपसाठीच नव्हे, तर देशातील सव्वाशे कोटी लोकांसाठी निर्णायक लढाई असेल, असे अमित शाह यांनी म्हटले होते.
अमित शाह यांच्या या विधानावर संजय निरुपम यांनी खोचक ट्विट केले. ट्विटमध्ये निरुपम म्हणतात, अमित शाह यांनी आगामी निवडणूक तिसऱ्या युद्धासारखी असल्याचे म्हटले आहे. पण पानिपतमधील युद्ध हे विजयासाठी नव्हे तर पराभवासाठी ओळखले जाते. भाजपाला पराभवाची चिंता वाटते का?, असा प्रश्न त्यांनी अमित शाह यांना विचारला.
अमित शाह ने कहा है कि अगला लोक सभा चुनाव
पानिपत के तीसरे युद्ध जैसा है।
पानिपत का वह युद्ध जीत के लिए नहीं हार के लिए जाना जाता है।
क्या #BJP को हार का डर सता रहा है ?— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 12, 2019
अमित शाह काय म्हणाले होते?
अमित शाह यांनी भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि पेशव्यांचा उल्लेख करत त्यांच्या अतुलनीय कर्तृत्वाची तुलना मोदींच्या बलाढ्य नेतृत्वाशी केली. मोदी विरुद्ध बाकी सगळे असा संघर्ष असून २०१४ इतकेच प्रचंड बहुमत मिळवून भाजप एनडीएचे सरकार केंद्रात बनवेल असे शहा म्हणाले होते. मराठ्यांनी १३१ लढाया जिंकल्या, पण पानिपतची एकच लढाई ते हरले आणि त्यानंतर भारताला दोनशे वर्षे गुलामगिरीत काढावी लागली, हे लक्षात असू द्या, असे त्यांनी म्हटले होते.