काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीतील उमेदवार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर जोरदार प्रचार करताना दिसत आहे. या प्रचारादरम्यान त्यांनी प्रतिस्पर्धी आणि अध्यक्षपदासाठीचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर नागपुरातील एका कार्यक्रमात भाष्य केलं आहे. मल्लिकार्जुन खरगे पक्षात बदल घडवू शकत नाहीत. ते निवडून आल्यास पक्षातील विद्यमान व्यवस्था कायम ठेवतील, असे शशी थरूर म्हणाले आहेत. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत विजय मिळाल्यास पक्षातील कार्यकर्त्यांच्या अपेक्षांप्रमाणे बदल करणार असल्याचे थरुर यांनी म्हटले आहे.
“आम्ही शत्रू नाही, किंवा हे युद्धही नाही. आमच्या पक्षाच्या भविष्यासाठी ही निवडणूक आहे. खरगे पक्षाच्या पहिल्या तीन नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्यासारखे नेते पक्षात बदल घडवू शकत नाहीत”, असे थरुर म्हणाले आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक मी कोणाचा विरोध करण्यासाठी नाही, तर पक्षाला मजबूत करण्यासाठी लढत असल्याचे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. झारखंडचे माजी मंत्री के. एन. त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
दोन्हीही नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांचे समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मल्लिकार्जुन खरगेंना पाठिंबा दर्शवला आहे. गांधी कुटुंबियांचेही खरगेंना समर्थन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.