Shashi Tharoor on Sharad pawar Remarks over JPC : काँग्रेसचे खासदार तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी अदाणी प्रकरणात शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं त्यावर भाष्य केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शशी थरूर यांनी शरद पवारांचं जेपीसी बाबतचं लॉजिक योग्य आहे असं म्हटलं आहे. मात्र त्यांनी आपलं मतही मांडलं आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना वाटतं आहे की अदाणी प्रकरणात जेपीसीचा उपयोग होईल.
शशी थरूर यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
“अदाणी प्रकरणात जेपीसीबाबत जे वक्तव्य शऱद पवार यांनी केलं आहे ते लॉजिकली बरोबर आहे. शरद पवार यांचं म्हणणं हे आहे की अशा प्रकरणात जेव्हा जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समिती नेमली जाते तेव्हा ५० टक्क्यांहून जास्त सदस्य हे सत्ताधारी पक्षाचे असतात. याचाच अर्थ अदाणी प्रकरणात अशी समिती स्थापन झाली तर ५० टक्केहून जास्त लोक हे भाजपा आणि एनडीएचे असतील. तरीही आम्हाला असं वाटतं आहे की या सगळ्या प्रकरणात जेपीसी असली पाहिजे. जेपीसी स्थापन झाली तर विरोधकांनाही या प्रकरणात प्रश्न विचारता येतील. आपण या प्रकरणातली कागदपत्रं आणि फाईल्सही पाहू शकतो” असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.
जेपीसीचा जो अधिकार आहे तो अधिकार आपण वापरला पाहिजे. त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. सरकाने अद्याप अदाणी प्रकरणात जेपीसीला मान्यता दिलेली नाही. मात्र जी बाब शरद पवार बोलत आहेत ती वेगळी आहे. ६ तारखेला आम्ही विजय चौकापर्यंत गेलो होतो तेव्हा एनसीपीनेही आम्हाला साथ दिली होती.
शरद पवार यांनी काय म्हटलं?
शरद पवार यांनी शुक्रवारी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की अदाणी प्रकरणात जेपीसी नेमण्याच्या मी पूर्णपणे विरोधात नाही. आत्तापर्यंत अनेकदा संयुक्त संसदीय समिती स्थापन झाली आहे. मी पण जेपीसीचा सदस्य होतो. जेपीसीमध्ये सत्ताधारी पक्षाचं पारडं जड असतं. त्यामुळे बहुमतावर निर्णय घेतला जातो. सुप्रीम कोर्टाची समिती ही जास्त प्रभावी ठरेल असं मला वाटतं हे शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच हिंडेनबर्ग या कंपनीचं नावही मी कधी ऐकलं नाही. अशा कंपनीच्या अहवालावरून इतका गोंधळ व्हायला नको होता असं म्हणत शरद पवारांनी राहुल गांधींचेही कान टोचले होते. आतालया सगळ्यावर शशी थरूर यांनी भाष्य केलं आहे. तसंच आपण जेपीसीसाठी आग्रही आहोत असंही म्हटलं आहे.