हुबळी : सत्ताधारी पक्षाच्या ‘लूट, असत्य, अहंकार आणि द्वेष’ यांच्यापासून सुटका मिळवल्याशिवाय कर्नाटक आणि पर्यायाने भारत प्रगती करू शकत नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी भाजपवर हल्ला चढवला.
आपला मुलगा राहुल गांधी याच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा द्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात होती. त्यामुळेच लाखो लोक चार हजार किलोमीटरच्या या यात्रेत सामील झाले, असे कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या पहिल्याच प्रचारसभेत सोनिया यांनी सांगितले.
‘‘भाजप सरकारच्या ‘काळय़ा राजवटीविरुद्ध’ आवाज उठवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे’’, असेही सोनिया म्हणाल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, तसेच तिकीट नाकारल्यामुळे भाजप सोडून अलीकडेच काँग्रेसमध्ये आलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे सभेत उपस्थित होते.
सहा वेळा आमदार राहिलेले शेट्टर यांना काँग्रेसने हुबळी- धारवाड मतदारसंघातून उमेदवारी दिले आहे. २०१८ साली त्यांनी येथूनच विधानसभा निवडणूक जिंकली होती.
भाजपच्या खोटय़ा आश्वासनांपासून सावध राहा – चिदम्बरम
नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी शनिवारी मणिपूरमधील हिंसाचाराचा संदर्भ देत कर्नाटकातील मतदारांनी ‘डबल इंजिन’ सरकारच्या खोटय़ा आश्वासनांपासून सावध रहावे, असा इशारा समाजमाध्यमातून दिला आहे. मणिपूरमधील आदिवासी आणि बहुसंख्य मैतेई समाजातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चिदम्बरम यांनी हा इशारा दिला आहे. संघर्षांमुळे नऊ हजारांहून अधिक लोक त्यांच्या गावांतून विस्थापित झाले आहेत.
खरगे यांच्यासह कुटुंबीयांच्या हत्येचा कट, काँग्रेसचा आरोप
बंगळूरु :काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हत्येचा कट भाजपकडून रचण्यात आला असून त्यासंबंधीची ध्वनिफीत काँग्रेसला मिळाली आह असा आरोप पक्षाने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाली यांनी येथील पत्रकार परिषदेत दावा केला की, खरगे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही ठार करण्याचा कट भाजपच्या नेत्यांकडून रचला जात आहे. भाजपच्या चित्तापूरमधील उमेदवाराच्या कथित आवाजातील ध्वनिफीतीतून हे दिसून येते, असे ते म्हणाले.
विहिंपची कायदेशीर नोटीस नवी दिल्ली : काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात बजरंग दलाविरुद्ध अपमानास्पद शेरेबाजी केल्याचा आरोप करून विश्व हिंदू परिषदेने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटीस बजावली असून, १०० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे. विहिंपची चंडीगड शाखा आणि त्यांची युवक शाखा असलेले बजरंग दल यांनी ४ मे रोजी ही नोटीस बजावली असून, १४ दिवसांत भरपाईची मागणी केलीआहे.