युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बाबा रामदेव यांच्या गळाभेटीचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. “अण्णा आंदोलनातून एकजण मुख्यमंत्री झाला, तर दुसरा मोठा व्यापारी झाला. अण्णा आंदोलनातून तुम्हाला काय मिळालं?” असा प्रश्न श्रीनिवास यांनी विचारला आहे. याबाबत ट्वीट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीनिवास यांनी २०११ मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आणि जनलोकपालच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावरून केजरीवाल आणि रामदेव बाबांना लक्ष्य केलंय. २०११ च्या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण केलं होतं. यानंतर तत्कालीन संपुआ सरकारने (UPA government) लोकपाल निर्मितीसाठी समितीचं गठण केलं. या निर्णयानंतर अण्णांनी आपलं ४ दिवस सुरू राहिलेलं उपोषण मागे घेतलं. यानंतरही जनलोकपाल विधेयक संसदेत पारीत झालं नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा उपोषण करावं लागलं. त्यामुळे सरकारने घाईगडबडीत लोकसभेत हे विधेयक संमत केलं आणि अण्णांनी आंदोलन मागे घेतलं.
“केजरीवाल आणि रामदेव बाबा यांच्या फोटोवरून अण्णा आंदोलनावर टीकास्त्र”
या आंदोलनात अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, कुमार विश्वास, संजय सिंह अशा अनेकांनी सहभाग घेतला होता. रामदेव बाबांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. नंतरच्या काळात यापैकी काही नेत्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि सत्तेतही आले. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरूनच काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केजरीवाल आणि रामदेव बाबा यांच्या फोटोवरून अण्णा आंदोलनावर टीकास्त्र डागलंय.
हेही वाचा : “…और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है ” ; सचिन सावंत यांनी साधला निशाणा!
ट्विटर अकाउंट हॅकवर श्रीनिवास यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी रविवारी (१२ डिसेंबर) सकाळी पंतप्रधान मोदी यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं त्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “हा योगायोग होता की प्रयोग होता, हॅकर्सला देखील भारतात बिटकॉईन विकण्यासाठी सर्वात मोठा सेल्समन कोण आहे हे माहिती होतं.” हॅकर्स मोदीजींच्या अकाउंटवरून बिटकॉइन विकत होते तेव्हा चौकीदार कोठे होते? असा प्रश्न श्रीनिवास यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये विचारला आहे.
“…और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है ”
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “चौकीदार अपना ट्विटर अकाउंट नहीं बचा सकता वह देश की सीमा कैसे बचा सकता हैं? और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है।” असं काँग्रेस नेते सचिन सावंत ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली होती. “‘पंतप्रधानांचं ट्विटर हँडल @narendramodi सोबत छेडछाड करण्यात आली होती. ट्विटरला याची माहिती देण्यात आली असून अकाऊंट तात्काळ पुन्हा सुरक्षित करण्यात आलं आहे. छेडछाड करण्यात आलेल्या काळात करण्यात आलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करा.”