अग्निपथ योजनेविरोधात देशात तीव्र विरोध करण्यात येत आहे. देशात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने करण्यात येत आहे. योजना मागे घेण्यात यावी यासाठी केंद्र सरकारवर विविध मार्गांनी दबाब टाण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे ‘मोदी हिटलरच्या वाटेवर चालले तर हिटलरप्रमाणे त्यांचाही मृत्यू होईल’, असं वादग्रस्त विधान सहाय यांनी केलं आहे.
काँग्रेसचे जंतरमंतरवर सत्याग्रह
अग्निपथ योजना आणि राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीवरून संतप्त झालेले काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय यांनी जंतर-मंतरवरील ‘सत्याग्रहा’च्या मंचावरून पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. सुबोध कांत यांनी ही टीका केली तेव्हा काँग्रेसचे अनेक मोठे नेते मंचावर उपस्थित होते आणि वादग्रस्त वक्तव्यानंतर टाळ्यांचा कडकडाटही झाला. गेले १० दिवस आपण संघर्षाचा सामना करत आहोत. गेल्या १३५ वर्षांचा इतिहास मोदींना माहीत नाही, पण आपण कोणती परंपरा पाळतो हे काँग्रेसच्या लोकांना माहीत असल्याचे सहाय म्हणाले. तसेच राहुल गांधी यांच्या अंगात दम आहे. डोळ्यात डोळे घालून जर कोणी बोलू शकतं ते राहुल गांधी असल्याचे सहाय म्हणाले.
काँग्रेस हा हुतात्म्यांचा पक्ष
झारखंडमध्ये आमचे युतीचे सरकार आहे, ते पाडण्यासाठी ईडीचे दीड महिन्यांपासून दररोज छापे पडत आहेत. भाजपाने आपली २-३ निवडून आलेली सरकारे कशी पाडली हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मदारीच्या रूपाने या देशात आलेले मोदी पूर्णत: हुकूमशाही चालवत असल्याची टीका सहाय यांनी केली. तसेच काँग्रेस हा हुतात्म्यांचा पक्ष असून काँग्रेसने कधीच लक्ष्मणरेषा ओलांडली नसल्याचेही सहाय म्हणाले.