पाच राज्यामधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे पक्षामध्ये खळबळ उडाली आहे. जी-२३ गटानं उघडपणे पक्षनेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करताना गांधी कुटुंबाने नेतृत्वावरून पायउतार होण्याची मागणी केली आहे. दुसरकडे कोअर कमिटीच्या बैठकीत गांधी कुटुंबीयांवरच विश्वास दर्शवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी भाजपाबद्दल मोठं विधान केलं आहे. तसेच, सोनिया गांधींविषयी देखील त्यांनी भूमिका मांडली आहे.
“भाजपा कायमस्वरूपी राहणार नाही”
वीरप्पा मोईली यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये भाजपाविषयी भूमिका मांडली आहे. “भाजपा काही कायमस्वरूपी राहणारा पक्ष नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपा टिकू शकणार नाही”, असं मोईली म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
“जी-२३ गट काँग्रेसला कमकुवत करत आहेत”
काँग्रेस पक्षनेतृत्वावर आक्षेप घेणाऱ्या जी-२३ गटावर देखील मोईली यांनी तोंडसुख घेतलं. “सोनिया गांधींना पक्षांतर्गत सुधारणा घडवून आणण्याची इच्छा आहे. मात्र, त्यांच्या भोवतीच्या लोकांमुळे ते शक्य होऊ शकत नाही”, असं मोईली म्हणाले आहेत.
“फक्त आपण सत्तेत नाही, म्हणून काँग्रेस नेते किंवा कार्यकर्त्यांनी गडबडून जाण्याची गरज नाही. भाजपा किंवा इतर पक्ष हे कायमस्वरूपी नाहीत. ते येतील आणि जातील. फक्त काँग्रेसच इथे राहील. आपण समाजातल्या शेवटच्या घटकाशी बांधील राहायला हवं. आपण आशा सोडता कामा नये”, असं देखील मोईली यांनी नमूद केलं आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे नेते आणि जी-२३ गटातील एक सदस्य असलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. जी-२३ गटानं काँग्रेस पक्षनेतृत्वाविरोधात घेतलेल्या भूमिकेसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.