पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीबाबत आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. दुसरीकडे या बैठकीबाबत पक्षातील जी-२३ गटानं देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने रविवारी ट्विट करत काँग्रेसमध्ये प्रतिभा आहे. मात्र विजयासाठी पक्षाला सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे म्हटले आहे.

आता तुम्ही काय करू शकता याचा विचार करण्याची गरज आहे, असे ट्विट काँग्रेसचे जेष्ठ नेते विवेक तानखा यांनी केले आहे. “आता पक्ष आपल्यासाठी नाहीतर आपण पक्षासाठी काय करू शकतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पुन्हा एकदा भारताच्या विचारांची पुनर्बांधणी करा. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे आणि आपण हे करू शकतो,” असे विवेक तनखा यांनी म्हटले आहे. चार वाजल्यापासून काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु झाली आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.

बैठकीमध्ये पंजाबकडे सर्वांचे लक्ष असेल, जिथे आम आदमी पक्षाच्या हातून काँग्रेसला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. निकालानंतर केवळ तीन दिवसांनी कार्यकारणीची बैठक बोलावणे असामान्य आहे, असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. साधारणपणे आठवडाभरानंतर ही बैठक बोलावली जाते. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी जी-२३ गटाचे नेते कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांनी गुलाम नबी आझाद यांच्या घरी पक्षाच्या खराब कामगिरीच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ५७ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसला पंजाबमध्ये सत्ता गमावाली लागली आहे. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. सोनिया गांधी काही काळापासून सक्रियपणे प्रचारात नाहीत. प्रियंका गांधी वड्रा यांच्याशिवाय राहुल गांधी हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. यासोबतच पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये भाऊ-बहीणीच्या जोडीचाही मोठा वाटा आहे.

Story img Loader