नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह व वादग्रस्त विधानांमुळे सोमवारी काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला. काँग्रेसचे नेते मनात येईल ते बोलत आहेत, या नेत्यांवर पक्षाच्या नेतृत्वाचे नियंत्रण नाही का, असा सवाल भाजपने केल्यामुळे काँग्रेसची कोंडी झाली. त्यामुळे या नेत्यांच्या विधानांपासून काँग्रेसने स्वत:ला वेगळे केले. शिवाय, या हल्ल्यासंदर्भात कोणतीही विधाने करण्यास नेत्यांना मनाई करण्यात आल्याचे समजते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, युद्ध हा पर्याय असू शकत नाही, असे विधान केल्यानंतर, पाकिस्तानच्या टीव्ही चॅनलवरून या विधानाचा गैरफायदा घेतला गेला. त्यावर भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत टीका केली. त्यानंतर काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांच्या विचारांशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही, ती त्यांची वैयक्तिक मते आहेत, ती काँग्रेसची भूमिका नाही असे रमेश यांनी सांगितले.

नेत्यांची वक्तव्ये

जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोझ यांनी, सिंधू जलकरार रद्द करण्याला विरोध केला. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्यात सहभाग नसल्याचे सांगितले आहे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे असेही त्यांचे मत होते. त्यावरून वादंग झाल्यावर केंद्राच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी घूमजाव केले. महाराष्ट्रातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील वादग्रस्त विधान केले. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. तर शशी थरूर भाजपच्या सुरात बोलत असल्याची टीका उदित राज यांनी केली.

पाकिस्तानला हवी असलेली भूमिका काँग्रेसचे नेते कशासाठी घेत आहेत? पाकिस्तान अशा विधानांचा स्वत:साठी उपयोग करून घेत आहे. – रविशंकर प्रसाद, खासदार, भाजप

काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये हल्ल्यासंबंधीच्या ठरावात काँग्रेसने केंद्र सरकारला पाठिंबा व्यक्त केला होता. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधींनी काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. – जयराम रमेश, माध्यम विभागप्रमुख, काँग्रेस</p>

वडेट्टीवारांची सारवासारव

नागपूर : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पर्यटकांना सुरक्षा का नव्हती, असा प्रश्न सरकारला करतानाच हल्ला झाला त्यावेळी दहशतवाद्यांना धर्म विचारायला वेळ होता काय, असे वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर गदारोळ निर्माण झाल्याने वडेट्टीवार यांनी सारवासारव करीत दहशतवाद्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकार जी कारवाई करेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे वक्तव्य केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य हेतू दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून भारतातील एकात्मता भंग करणे आणि देशात अस्थिरता निर्माण करणे हा आहे, असे ते म्हणाले. पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या नाहीत, हे वडेट्टीवार यांचे वक्तव्य मूर्खपणाचे आणि मृतांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळणारे असल्याची टीका फडणवीस यांनी केली.