महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मोहन प्रकाश यांच्यावर संक्रात येण्याची शक्यता काँग्रेसच्या वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. जयपूर येथील चिंतन शिबिरानंतर अ. भा. काँग्रेसमध्ये बहुप्रतिक्षित फेरबदल होऊ घातला असताना ‘बाहेरून’ आलेले मोहन प्रकाश यांच्या विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली असून त्यांच्या वाढत्या ‘महत्त्वाकांक्षे’मुळे काँग्रेसश्रेष्ठीही त्यांच्यावर नाराज झाल्याचे समजते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचीही मोहन प्रकाश यांनी नाराजी ओढविली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे तरुण सरचिटणीस व ‘युवराज’ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षांच्या प्रारंभी उत्तर प्रदेशात लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची प्रचंड धुळदाण उडाली. या दारुण पराभवात चुकीच्या उमेदवारांची निवड करणारे मोहन प्रकाश यांचा सिंहाचा वाटा असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतात.  २४, अकबर रोडमधील बहुसंख्य काँग्रेस नेते विरोधात असताना बदललेल्या परिस्थितीत मोहन प्रकाश अ. भा. काँग्रेसमधील फेरबदलात त्यांचे स्थान काय असेल यावर आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

Story img Loader