नवी दिल्ली:  अमेठी व रायबरेली मतदारसंघांतील काँग्रेसच्या उमेदवारांची गुरुवारी घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती बुधवारी पक्षाचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी दिली. या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मे असल्याने उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसकडून दिरंगाई होत नसल्याचा दावा रमेश यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेठीमधून राहुल गांधी व रायबरेलीमधून प्रियंका गांधी-वढेरा यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी सातत्याने केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास फक्त दोन दिवस उरले असतानादेखील काँग्रेसने उमेदवारी जाहीर न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमेठी व रायबरेलीमधून गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवण्यास घाबरत असल्याची टीका अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी केली आहे. त्यावर, ‘भाजपविरोधात लढायला कोणीही घाबरत नाही. दोन्ही मतदारसंघांमधील उमेदवार पुढील २४-३० तासांमध्ये जाहीर केले जातील’, असे रमेश यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मोदी हमीने ‘उत्तर मुंबई’चा गतीने विकास – पियूष गोयल यांचे प्रतिपादन

काँग्रेस दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या भाजपच्या आरोपावर रमेश यांनी, ‘रायबरेलीत भाजपने तरी कुठे उमेदवार जाहीर केला’, असा प्रतिप्रश्न केला. ‘अमेठीमध्ये स्मृति इराणी विद्यमान खासदार असल्याने त्यांचे नाव भाजपला जाहीर करावे लागले. काँग्रेसमध्ये दोन्ही जागांसंदर्भात चर्चा केली जात आहे’, असे रमेश यांनी सांगितले.  राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या निवडणूक लढण्यासंदर्भातील संदिग्धता रमेश यांनी कायम ठेवली. केंद्रीय निवड समितीने या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे सोपवली आहे. खरगेच दोन्ही जागांच्या उमेदवारांचा निर्णय घेतील, असे रमेश म्हणाले. राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा दोघेही उत्तरेतून निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे सांगितले जात आहे. या दोघांची मनधरणी केली जात असून त्यांच्यापैकी एकाने तरी अमेठी वा रायबरेलीतून निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २०१९ मध्ये अमेठीमधून स्मृति इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress likely to announce candidates name for amethi and rae bareli today zws