जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने आणि पद्धतीने महिला दिनाच्या निमित्ताने संदेश आणि शुभेच्छा देत आहे. मात्र, महिला दिनाचा ‘हटके’ संदेश देण्यासाठी एक महिला आमदार चक्क घोड्यावरून विधानभवनात पोहोचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. घोडेस्वारी आवडत असून त्याद्वारे महिला दिनाचा संदेश देण्याचा आपण प्रयत्न केल्याचं या महिला आमदारांनी सांगितलं. तसेच, ही बाब (घोडेस्वारी) देखील महिलांसाठी समान्य गोष्ट आहे, हे दाखवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं या महिला आमदारांनी सांगितलं.
काँग्रेसच्या या महिला आमदारांचं नाव आहे अंबा प्रसाद! अंबा प्रसाद या झारखंडच्या बरकागाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. अंबा प्रसाद त्यांच्या आक्रमक भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अंबा प्रसाद यांनी झारखंड विधान भवनापर्यंत घोड्यावर प्रवास करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अंबा प्रसाद यांनी महिला दिनानिमित्ताने दिलेला संदेश देखील चर्चेत आहे.
“प्रत्येक महिलेमध्ये दुर्गा आणि झाशीची राणी”
समाजातल्या प्रत्येक महिलेमध्ये दुर्गा आणि झाशीची राणी असल्याचं यावेळी अंबा प्रसाद म्हणाल्या. “घोडा हे सामर्थ्य आणि धैर्याचं प्रतीक आहे. महिला दिनाच्या निमित्ताने घोडेस्वारी करून मला महिला सशक्तीकरणाचा संदेश द्यायचा आहे. प्रत्येक महिलेमध्ये दुर्गा आणि झाशीची राणी असते. महिलांनी प्रत्येक आव्हान समर्थपणे पेलायला हवं. पालकांनी देखील आपल्या मुलींना उत्तम दर्जाचं शिक्षण द्यायला हवं”, असं अंबा प्रसाद यावेळी म्हणाल्या.
“पेट्रोलच्या किमती वाढणार आहेत, त्यामुळे…”
दरम्यान, यानिमित्ताने अंबा प्रसाद यांनी केंद्र सरकारवर देखील खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “आता उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणार आहे. त्यामुळे माझी सफारी तयार आहे”, असं अंबा प्रसाद म्हणाल्या आहेत.
“प्रत्येक दिवस आमचा आहे. समाजामधला एक विचार बदलण्याची माझी इच्छा आहे. महिलांसाठी देखील ही (घोडेस्वारी) सामान्य गोष्ट होऊ शकते हे मला दाखवून द्यायचं आहे. समाजात महिलांचा सहभाग अधिकाधिक वाढायला हवा. मुलींचं योगदान समाजासाठी फायद्याचं ठरेल”, असं देखील अंबा प्रसाद म्हणाल्या.