पीटीआय, नवी दिल्ली
बेकायदा खाणींतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंदर पंवार यांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. ५५ वर्षीय पंवार यांना गुरुग्राममधून पहाटे ताब्यात घेण्यात आले. त्यांना विशेष आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना २९ जुलैपर्यंत ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हरियाणातील यमुनानगर भागात मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकाम केल्याच्या आरोपावरून ईडीने जानेवारीत पंवार यांच्या मालमत्तेवर छापा टाकला होता. त्यानंतर यमुनानगरमधील भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे (आयएनएलडी) माजी आमदार दिलबाग सिंग, त्यांचा सहकारी कुलविंदर सिंग यांना अटक केली होती.
राष्ट्रीय हरित लवादाकडून बंदी असतानाही यमुनानगर आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणात दगड, खडी आणि वाळूचे उत्खनन झाले आहे. या बैकायदा उत्खननाची चौकशी करण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अनेक ‘एफआयआर’ नोंदवले आहेत. हरियाणा सरकारने २०२० मध्ये ‘ई-रावण’ योजना आणली होती. ईडी या योजनेतील कथित फसवणुकीची चौकशी करीत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, कथित बेकायदेशीर खाणकामातून सुमारे ४००-५०० कोटी रुपयांचा निधी निर्माण झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून काँग्रेसची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “संविधानिक संस्थांना…”
एक कोटीहून अधिकची मालमत्ता जप्त
●बँक-कर्ज फसवणुकीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात हरियाणाचे काँग्रेस आमदार राव दान सिंह, त्यांचा मुलगा आणि काही व्यावसायिक संस्थांमध्ये केलेल्या झडतीत १.४२ कोटी रुपये रोख, ३० हून अधिक सदनिका आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रे जप्त केल्याचे सक्तवसुली संचालनालयाने शनिवारी सांगितले.
●दिल्ली आणि जमशेदपूर (झारखंड) व्यतिरिक्त हरियाणातील महेंद्रगड आणि गुरुग्राममध्ये गुरुवारी (१८ जुलै) हे छापे टाकण्यात आले.
●आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आरोपींविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांतून सुरू झाला आहे. यात कॅनरासह अन्य बँकांचे १,३९२.८६ कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.