Congress MLA On Rashmika Mandanna Over disregarding Kannada : अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिचा नवीन चित्रपट छावामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याबरोबर रश्मिकाची महत्त्वाची भूमिका आहे. यादरम्यान कर्नाटकच्या मांड्या विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवी कुमार गनीगा यांनी रश्मिका मंदाना हिच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
काँग्रेस आमदार गनिगा यांनी बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवाला उपस्थित राहण्याचे नाकारल्याचा आरोप करत अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्यावर टीका केली आहे. इतकेच नाही तर ज्या इंडस्ट्रीमधून (कन्नड) तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिला धडा शिकवू नये का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रश्मिकाने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरूवात ही २०१६ मध्ये कन्नड चित्रपट किरिक पार्टी मधून केली होती, या चित्रपटात तिच्याबरोबर रक्षित शेट्टी देखील होता.
नेमकं प्रकरण काय आहे?
“कर्नाटकातील कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रश्मिका मंदानाने गेल्या वर्षी आम्ही आमंत्रित केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (बेंगळुरू) उपस्थित राहण्यास नकार दिला होता,” असे गनिगा यांनी सोमवारी सौधा येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
गनिगा यांनी केलेल्या आरोपांनुसार, कन्नड चित्रपटसृष्टीतून कारकिर्दीची सुरूवात करूनही अभिनेत्री मंदानाने कर्नाटक आणि कन्नड भाषेकडे दुर्लक्ष त्यांचा अनादर केला. रश्मिका मंदाना हिला अनेकदा निमंत्रित करून देखील कर्नाटकला येण्यासाठी वेळ नाही असे सांगत तिने कार्यक्रमाला येण्यास नकार दिला असे काँग्रेस आमदाराचे म्हणणे आहे.
“ती म्हणाली की, ‘माझे घर हैद्राबाद येथे आहे, मला माहिती नाही की कर्नाटक कुठे आहे, आणि माझ्याकडे वेळही नाही. मी येऊ शकत नाही.’ आमचे एक आमदार मित्र निमंत्रित करण्यासाठी १० ते १२ वेळी तिच्या घरी गेले, पण तिने नकार दिला आणि इतकेच नाही तर तिने इंडस्ट्रीमध्ये मोठी होऊनही कन्नड भाषेची उपेक्षा केली. आपण त्यांना धडा शिकवू नये का?” असे गनिगा म्हणाली. रश्मिकाच्या वागण्याचे परिणाम भोगावे लागतील असेही गानिगा यांचे म्हणणे आहे.
Bengaluru | Congress MLA Ravikumar Gowda Ganiga says, "Rashmika Mandanna, who started her career with the Kannada movie Kirik Party in Karnataka, refused to attend the International Film Festival last year when we invited her. She said, 'I have my house in Hyderabad, I don’t know… pic.twitter.com/uftmWfrMZ6
— ANI (@ANI) March 3, 2025
उपमुख्यमंत्र्यांची कन्नड कलाकारांवर टीका
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शनिवारी १६ व्या बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला गैरहजर राहिल्याबद्दल कन्नड चित्रपट कलाकारांवर टीका केली. ते म्हणाले की, “जर कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांची एकसारखी भावना नसेल तर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काय अर्थ आहे? फिल्म चेंबर आणि अकादमीला विनंती किंवा इशारा समजा. चित्रपट काही मोजक्या लोकांसाठी नाही – सरकारी मदत अत्यंत महत्त्वाची आहे.”