Congress MLA Ravi Ganiga on Rashmika Mandanna : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला तिचा ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय, तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकमधील एका आमदाराने तिचा उल्लेख करत केलेल्या एका वक्तव्यामुळे देखील ती चर्चेत आली आहे. या आमदाराने आरोप केला आहे की तिने कर्नाटकमधील एका फिल्म फेस्टिव्हलचं आमंत्रण नाकारलं आहे. यासह आमदाराच्या त्या वक्तव्यामुळे वातावरण तापलं आहे. तसेच कोडवा समुदायाने रश्मिकाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आपल्या वक्तव्यामुळे वाद वाढल्यानंतर आता त्या आमदाराला स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे. कारण या आमदाराने म्हटलं होतं की रश्मिकाने फिल्म फेस्टिव्हलचं निमंत्रण नाकालं आहे. तिला धडा शिकवावा लागेल.

या आमदाराचं नाव रवी गनिगा असं असून त्यांनी रश्मिकाला धडा शिकवण्याबाबतचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी व विरोधी पक्षांमधील नेत्यांनी रवी गनिगा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सर्व स्तरातून टीका सुरू झाल्यानंतर गनिगा यांना घडल्या प्रकारावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

रश्मिकाबद्दल केलेल्या वक्तव्यावर रवी गनिगा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एएनआयशी बातचीत करत असताना रवी गनिगा म्हणाले, “मी म्हणालो की मी तिला धडा शिकवेन याचा अर्थ असा नव्हे की मी तिला काही इजा पोहोचवेन. किंवा तिच्यावर वैयक्तिक पातळीवर हल्ला करण्याचं माझं उद्दीष्ट नव्हतं. माझं तिला केवळं एवढंच सांगणं होतं की तू ज्या शिडीच्या सहाय्याने इतक्या उंचीवर पोहोचली आहेस ती शिडी, त्या पायऱ्या विसरू नकोस. त्या शिडीवर लाथ मारू नकोस. तसं केलंस तर तू खाली पडशील. मला तिला एवढंच सांगायचं होतं की तू तुझ्या राज्याचा सन्मान राखायला हवा. मी रश्मिकाचे चित्रपटही पाहिले आहेत. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी माझे शब्द, माझं राज्य, माझी भूमी आणि माझ्या कन्नड भाषेच्या सन्मानासाठी भूमिका घेत राहणार, बोलत राहणार.”

“त्या बातम्या पूर्णपणे खोट्या…”, काँग्रेस आमदाराच्या दाव्यावर रश्मिकाचं भाष्य

रवी गनिगा यांनी बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास रश्मिकाने नकार दिल्याचा आरोप केला होता. तसेच ज्या इंडस्ट्रीमधून (कन्नड) तिने तिच्या कारकि‍र्दीची सुरुवात केली, त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिला धडा शिकवू नये का? असा थेट प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर रश्मिकाच्या टीमने हे सर्व आरोप ‘पूर्णपणे खोटे’ असल्याचं म्हटलं आहे.

Story img Loader