ईदच्या दिवशीही विधिमंडळाचे कामकाज सुरू ठेवल्याबद्दल काँग्रेसच्या आमदारांनी बुधवारी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. काँग्रेसच्या आमदारांची ही कृती म्हणजे विधिमंडळाच्या कारभारात राजकारण आणण्याचा प्रकार असल्याची टीका विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांनी केली.
गोवा काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंगळवारी बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला. एखाद्याला विशिष्ट धर्माचे पालन करण्याचा अधिकार असतानाही गोवा सरकारची ही कृती म्हणजे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील घाला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
ईदच्या दिवशीही कामकाज घेण्याबाबत विरोधी पक्षाच्या सदस्यांना विश्वासात घेण्यात आले होते. मात्र राजकीय लाभ उठविण्यासाठी अखेरच्या क्षणी विरोधकांनी संधी साधली, असे आर्लेकर म्हणाले. राज्य विधिमंडळाचा वापर राजकारणासाठी करणे अयोग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.