कर्नाटक विधानसभेतील कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी शुक्रवारी पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांच्या पारड्यात आपले मत टाकले. सिद्धरामय्या हेच आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार, हे आता स्पष्ट झाले आहे. 
मुख्यमंत्रीपद कोणाला द्यावे, हे जाणून घेण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीच्या चार सदस्यांनी शुक्रवारी नवनिर्वाचित आमदारांचे गोपनीय पद्धतीने मतदान घेतले. त्यामध्ये सर्वाधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या पारड्यात आपले मत टाकले. केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.
मुख्यमंत्रीपदासाठी जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी सिद्धरामय्या आणि खर्गे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचीही भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २० मिनिटे चर्चा झाली.

Story img Loader