राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ‘राष्ट्रपत्नी’ असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी वादात सापडले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपा खासदार स्मृती इराणी चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. या प्रकारानंतर आता चौधरी यांनी स्मृती इराणी यांच्यावर कारवाई करण्यात यावी मागणीचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे. अधिवेशन कामकाजादरम्यान इराणी यांनी वारंवार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा केवळ द्रौपदी मूर्मू असा उल्लेख केल्यामुळे त्यांच्यावर करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

स्मृती इराणींवर कारवाई करण्याची मागणी

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या या पत्रात अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘राष्ट्रपती’ हा शब्द न वापरता केवळ ‘द्रौपदी मुर्मू’ या नावाने उल्लेख केल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे. “स्मृती इराणी ज्या पद्धतीने सभागृहात माननीय राष्ट्रपतींचे नाव घेत होत्या ते योग्य नव्हते. राष्ट्रपती हा शब्द न वापरता त्या सतत केवळ द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचा जयजयकार करत होत्या. हा स्पष्टपणे राष्ट्रपतींचा अपमान आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाची प्रतिष्ठा राखण्यासाठी स्मृती इराणी यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी माझी मागणी असल्याचे चौधरी म्हणाले.

राष्ट्रपत्नी उल्लेख केल्याप्रकरणी राष्ट्रपतींची मागितली माफी

आपल्या पत्रात अधीर यांनी राष्टपतींचा राष्ट्रपत्नी उल्लेख केल्याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. माझी हिंदी फार चांगली नसल्यामुळे ही चूक झाली. मी माझी चूक मान्य केली असून राष्ट्रपतींची माफीही मागितली आहे. राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र लिहून मी चुकून तुमच्यासाठी चुकीचा शब्द वापरला. माझी जीभ घसरली. मी माफी मागतो आणि मला माफ करण्याची विनंती पत्रात केली असल्याचे अधीर रंजन चौधरींनी स्पष्ट केले आहे.