गेल्या पाच दिवसांपासून ओडिशात प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई पाहायला मिळत आहे. या कारवाईमध्ये प्राप्तिकर विभागानं तब्बल ३५० कोटींहून जास्त रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. काँग्रेसचे स्थानिक खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित काही मालमत्ता व त्यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यांमधून ही रक्कम ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या नोटा इतक्या होत्या, की त्या मोजायलाच प्राप्तिकर विभागाच्या पथकाला तब्बल पाच दिवस लागले. एखाद्या तपास यंत्रणेनं एका छाप्यात हस्तगत केलेली ही आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी रक्कम असल्याचं सांगितलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी संध्याकाळी उशीरा नोटामोजणीचं काम संपलं. यानंतर या सगळ्या कारवाईचा आवाका नेमका केवढा मोठा होता, याचा अंदाज आला. धीरज साहू यांच्याशी निगडित मालमत्तांवरून ताब्यात घेण्यात आलेल्या या नोटा तब्बल १७६ बॅगांमध्ये भरून एसबीआयच्या बालंगीर, संबलपूर आणि तितलागड शाखांमध्ये नेण्यात आल्या होत्या. तीन शांखांमधील कर्मचाऱ्यांनी मिळून ही सगळी नोटामोजणी पाच दिवस राबून पूर्ण केली!

२५ मशीन, ५० अधिकारी व पाच दिवस मोजणी!

एसबीआयच्या बालंगीर शाखेतील अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “प्राप्तिकर विभानं जप्त केलेल्या नोटांची मोजणी करण्यासाठी आम्हाला पाच दिवस लागले. त्यासाठी एकूण २५ नोटा मोजणीच्या मशीन आणि तब्बल ५० बँक कर्मचारी ओव्हरटाईम व शनिवार-रविवारदेखील काम करून नोटामोजणी करत होते. यातून जमा झालेली एकूण रक्कम ३०५ कोटी आहे”.

पैसा किती होता माहितीये? इथे पाहा व्हिडीओ!

बालंगीर शाखेव्यतिरिक्त एसबीआयच्या संबलपूर शाखेत ३७.५० कोटी रुपयांच्या तर तितलागड शाखेत ११ कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी झाली. त्यामुळे जप्त केलेल्या नोटांची एकूण रक्कम ३५० कोटींच्या पुढे गेली.

जमा केलेल्या रकमेचं काय करणार?

दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेचं प्राप्तिकर विभाग पुढे काय करणार? याची सध्या चर्चा चालू असून ही रक्कम प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात येईल त्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल, अशी माहिती एसबीआयमधील सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे.

“काँग्रेस भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर मोदीजी…”, धीरज साहू प्रकरणावरून जेपी नड्डा यांची राहुल गांधींवर टीका

हा एवढा पैसा आला कुठून?

दरम्यान, जी रक्कम मोजायलाच ५० कर्मचाऱ्यांना पाच दिवस लागले, ती रक्कम आली तरी कुठून? याचा शोध आता प्राप्तिकर विभागाचे अधिकारी घेत आहेत. यासाठी धीरज साहू यांच्या मालकीच्या मद्यनिर्मिती कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सध्या केली जात आहे. यामध्ये ओडिशातील बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीज लिमिटेड संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ही कंपनी धीरज साहू यांच्या काही कुटुंबीयांकडून चालवली जाते. धीरज साहू यांचे पुत्र रितेश साहू या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असून मोठे बंधू उदयशंकर प्रसाद कंपनीचे प्रमुख आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp dheeraj sahu it raid note counting ends 350 crore seized pmw