Gaurav Gogoi on Ranveer Allahbadia: प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या शो मध्ये अश्लील आणि वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर संबंध देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई आणि आसाममध्ये ‘इंडिया गॉट लेटेंट’चे आयोजक आणि रणवीरसह अपूर्वा मखीजा, समय रैना यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी सोमवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. तसेच अशा लोकांना तुम्ही जाहिर प्रसिद्धी कसे काय देता? असा सवालही उपस्थित केला आहे.

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोण आवडते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यांनी पंतप्रधान म्हणून जाहिररित्या काही लोकांना प्रसिद्धी देताना अधिक जबाबदार राहिले पाहिजे. आपल्या ट्विटमध्ये गोगोई म्हणाले, “मला आशा आहे की, पंतप्रधान मोदी यापुढील काळात एखाद्याला जाहिररित्या प्रसिद्धी देताना अधिक काळजी घेतील. वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला कुणीही आवडत असेल पण देशाचे पंतप्रधान म्हणून तुम्ही अधिक जबाबदारीने वागले पाहिजे.”

रणवीर अलाहबादियाच्या ‘बिअर बायसेप्स’ या युट्यूब चॅनेलला मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार २०२४ या सोहळ्यात ‘डिसरप्टर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला होता. रणवीरने आतापर्यंत अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ज्यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणवीर अलाहबादियाच्या कंटेट क्रिएशनचे एकेकाळी कौतुक केल्यामुळे विरोधकांनी भाजपाला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच त्याच्या विधानाचे राजकीय क्षेत्रातही पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीही काही एक मर्यादा असते. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित करू असे म्हटले.

रणवीर अलाहाबादियाचा माफिनामा

रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये केलेल्या त्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले, “मी इंडियाज गॉट लेटेंटमध्ये जे बोललो ते मी बोलायला नको होते. मला माफ करा. माझी टिप्पणी फक्त चुकीचीच नव्हती, तर मजेदारही नक्कीच नव्हती. कॉमेडी मला जमत नाही, मी इथे फक्त सॉरी म्हणायला आलो आहे.”

रणवीर पुढे म्हणाला, “जे काही घडले त्यामागील कोणतेही संदर्भ किंवा कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. माझ्याकडून चूक झाली. मी ते बोलायला नको होतं. पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात, मला जबाबदारीचे भान नसलेली व्यक्ती व्हायचे नाही. मला या प्लॅटफॉर्मचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करायचा आहे, हेच मी माझ्या अनुभवांमधून शिकलोय. मी निर्मात्यांना व्हिडीओतील असंवेदनशील विधाने हटवण्यास सांगितले आहे. पुन्हा एकदा मी माफी मागतो, तुम्ही सगळे मला माफ कराल, अशी आशा आहे.”

Story img Loader